मुंबई:राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा गेल्या १५ दिवसांपासून सुटलेला नाही. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपात रस्सीखेच सुरु असल्याने नवीन सरकार बनू शकलेले नाही. दरम्यान आज गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली आहे. दरम्यान बैठकीनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला स्वत:हून युती तोडायची नाही, परंतु जे ठरले आहे त्याप्रमाणे व्हावे, त्यापलीकडे मला काहीही अपेक्षा नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल यावर शिवसेना ठाम असून आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत तोच सूर उमटला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमच्यात ५०-५० चा फॉर्म्युला ठरला असून यावर आता भाजपने शब्द फिरविला आहे. मात्र जे ठरले आहे तसे व्हावे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेना आमदारांची हॉटेल रंगशारदामध्ये रवानगी
शिवसेना आमदारांची बैठक संपली असून आता सर्व आमदारांची मुंबईतील हॉटेल रंगशारदामध्ये रवानगी करण्यात आली आहे. आजचा दिवस राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आमदार फुटण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व आमदारांना हॉटेल रंगशारदा येथे दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहे.