मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना सूचना

0

मुंबई: दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ रोजी मनसेचे महाअधिवेशन झाले. या अधिवेशनात मनसेने नवीन ध्वज आणि पक्षाची आगामी भूमिका जाहीर केली. हिंदुत्वाची भूमिका पक्षाने घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना कार्यकर्ते आता हिंदूह्रदयसम्राट म्हणायला लागले आहे. दरम्यान आज सोमवारी २७ रोजी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशा सूचना केल्या आहेत. बैठकीला राज ठाकरे आले मात्र ते लागलीच निघून गेले. थ्रोट इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांकडे जायचे असल्याने राज ठाकरे लवकर बैठकीतून निघून गेले

मनसेतर्फ ९ फेब्रुवारीला सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शॅडो कॅबिनेट, सीएए मुद्द्यांवर चर्चा होणार होती. राज ठाकरे बैठकीसाठी हजर राहिले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आपल्याला हिंदूह्रदयसम्राट संबोधू नका अशा सूचना केल्या. पक्षाचं पहिलं महाअधिवेशन पार पडल्यानंतर अनेकांनी राज ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी ही सूचना केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख केला जातो.