मुंबई : मुंबईच्या मुलुंड येथील हा 23 वर्षीय तरुण मंगळवारपासून बेपत्ता आहे. त्याच्या बेपत्ता होण्यामागे तरुणीचा हात असल्याची शक्यता त्याच्या कुटुंबियांनी वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी मुलुंड पोलिस ठाण्यात दिली आहे.
मला मुंबई विद्यापीठात काम आहे. बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाचा एक फॉर्म भरायचा आहे, असं कुटुंबियांना सांगून मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जगदीश घरातून निघाला होता. त्यानंतर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास जगदीशने घरातल्यांना फोन केला होता. त्यावेळी मला हिंदू धर्म आवडत नाही, इस्लाम धर्म स्वीकारायचा आहे. आता मी घरी परतणार नाही, असं शेवटचं वाक्य तो फोनवर बोलला. जगदीशने सोबत स्वतःचे सर्व कागदपत्र आणि आवश्यक साहित्यही नेले अशी माहिती त्याचा भाऊ भावेश परिहार याने पोलिसांना दिली आहे.
जगदीश फेसबुकवर एका पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता. याबाबत त्याच्या कुटुंबाने वारंवार त्याला हटकले होते. परंतु तरी तो फेसबुक आणि अन्य समाजमाध्यमांद्वारे तरुणीच्या संपर्कात होता. घरातून जाण्याआधी त्याने त्याचं फेसबुक अकाउंट डिलीट केलं असून कंप्युटरमधील सगळा डेटा उडवला. तो पाकिस्तान किंवा आखाती देशात पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून त्याने आपल्या कुटुंबियांशी शेवटचा संपर्क केला. आम्ही त्याचा शोध घेत असून याबाबत शक्य तेवढी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती घटनेचा तपास करणारे मुलुंड पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली आहे.