मलिष्काची पंचाईत

0

मलिष्काने या गाण्यातून महानगरपालिकेचे वाभाडे काढलेले नाहीत, तर मुंबईकरांची व्यथा मांडलेली आहे. ही व्यथा फारशी गंभीर न घेता एक मनोरंजन म्हणून पाहिले असते, तर हे प्रकरण पुढे गेले नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक थोर व्यंगचित्रकार होते. त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या चष्म्यातून मलिष्काचे हे गाणे पाहिले असते, तर फारसा वाद वाढला नसता.

या वादात भाजपनेही उडी घेतली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मलिष्काची पाठराखण करत, तिचे समर्थन केले आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत नसली तरी महापालिकेत भाजप शिवसेनेला त्यांनी पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा म्हणजे सत्ताधार्‍यांचे समर्थनच होय. सत्तेत येण्यापूर्वी भाजपने मुंबईतील नालेसफाई रस्ते दुरुस्ती आदी प्रश्‍नांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. दोन दशके महापालिकेत सौख्याने नांदणारे हे दोन पक्ष कट्टर विरोधक म्हणून निवडणुकांमध्ये एकमेकांना सामोरे गेले. मात्र, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अखेर शिवसेनेला महापौरपदासाठी आणि सर्व समित्यांसाठी पाठिंबा देऊन भाजप पहारेकर्‍यांच्या भूमिकेत राहिली. पण पहारेकरी म्हणजे काय? या पहारेकर्‍याने गेल्या सहा महिन्यांत काय पहारा दिला अर्थात शिवसेनेच्या कोणत्या गैरप्रकारांना आळा घातला? हे स्पष्ट व्हायला हवे. फक्त विरोधासाठी विरोध म्हणून भाजप मलिष्काच्या पाठीशी उभी राहिली का? याची स्पष्टता झालेली नाही.

बंडखोर शिवसेना नेते आणि आता काँग्रेसच्या आश्रयाला असलेले नारायण राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे यांनीही या वादात उडी घेतली आहे. ‘वाघोबा करतो म्याव म्याव, आम्ही आणि मलिष्का बहीणभाव’, असे ट्वीट करून नीतेश राणे यांनी मलिष्काला पाठिंबा दिला आहे. नीतेश राणे यांचे हे ट्वीट गंभीर घेण्यासारखे नाही. भाजपच्या दाराशी जाण्यापूर्वी हे शिवसेनेच्या दाराशी गेले होते, पण उद्धव ठाकरे यांनी या पिता-पुत्रांना फारसा भाव दिला नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘गजनी’ संबोधून त्यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीका करण्याएवढे ते नक्कीच मोठे नाहीत. उद्धव ठाकरे हे या महाशयांना अनुल्लेखाने मारतात. फारसे लक्ष देत नाहीत. यावरून यांची पात्रता समजते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मलिष्काची बाजू न घेता खड्ड्यांच्या प्रश्‍नावरून शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. खड्ड्यांच्या प्रश्‍नावरून तुम्ही किती जणांची तोंडे बंद करणार आहात? असा सवाल मनसेने केला आहे. मनसेला हा प्रश्‍न विचारण्याचा अधिकार आहे का? तुम्ही नाशिकमध्ये सत्तेत असताना नाशिककरांची स्वप्ने पूर्ण केली का? मुंबई महापालिकेत गेल्या वेळी मनसेचे 33 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी आम्ही महापालिका कारभारावर अंकुश ठेवू, अशी वल्गना मनसेचे मालक राज ठाकरे यांनी केली होती. पण अंकुश सोडा स्वत:च्या नगरसेवकांचे वॉर्डही मनसे वाचवू शकली नाही. मलिष्काच्या निमित्ताने मनसेलाही तोंड उघडण्याची संधी मिळाली आहे. परंतु, नीतेश राणे आणि भाजपप्रमाणे थेट मलिष्काची बाजू घेण्याचे धैर्य मनसेने दाखवलेले नाही.

शिवसेनेनेही मलिष्काचे हे गाणे गंभीरपणे घेऊन मलिष्काला मोठे करण्याचा प्रयत्न केला आहे. मलिष्काच्या राहत्या घरी कुंड्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या म्हणून तिच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. शिवसेना आता 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा तिच्यावर ठोकणार आहे. या सर्व प्रकारामुळे कुणाला फारशी माहित नसलेली मलिष्का लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली आहे.

आयफा अवॉर्डसाठी मलिष्का परदेशात असल्याने सध्या तरी या वादापासून ती दूर आहे. तिने या वादाबाबत काही प्रतिक्रिया न देता गप्प बसणे पसंत केले आहे. ही तिला सुबुद्धी झाली आहे. अन्यथा कॉमेडियन कपिल शर्माची जी अवस्था झाली ती तिची होईल. मलिष्काचे गाणे हे तिला वादात ओढण्याचे कारण असले तरी या गाण्याचा मूळ कवी कोण? याची माहिती अद्याप माध्यमांना मिळालेली नसावी.

मलिष्का वयाने लहान आहे. या वादग्रस्त गाण्याने तिला प्रसिद्धी मिळाली, असली तरी वाद ओढवणारी अशी गाणी गाण्याच्या फंदात कलाकार पडत नाहीत. तिने हे गाणे गायले असले तरी आता या वादात उडी घेऊ नये, यातच तिचे कल्याण आहे. असे असले तरी या प्रकरणाकडे सत्ताधारी म्हणून शिवसेनेने तटस्थ राहून पाहणे गरजेचे आहे. एखादा कुणीतरी चूक सांगत असेल, तर चूक सांगणार्‍याकडे न पाहता त्याने काय चूक दाखवून दिली त्याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यातूनच शिवसेनेचे मोठे हृदय दिसून येणार आहे. मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या शहरातील रस्ते ही प्राथमिक गरज आहे कोणत्याही शहराचा विकास हा त्याच्या दळणवळणातील गतीवर अवलंबून असते, जर मुंबईची रफ्तार जर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे धिमी होत असेल, तर हे मुंबई आणि पर्यायाने देशाचा विकास रखडणार आहे. त्यामुळे मुंबईचा विकास साधण्यासाठी शिवसेनेने मलिष्काच्या गाण्याचे स्वागत केल्यास वावगे ठरणार नाही! मुंबईचा विकास साधणे हे शिवसेनेसाठी अजून आव्हान बनले आहे. मागील 25 वर्षे शिवसेना महापालिकेत सत्तास्थानी आहे. तरीही शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे, ही दुर्दैवी बाब आहे तसेच शिवसेनेसाठी आत्मपरीक्षण करण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे शिवसेनेने होणार्‍या टीकेचे उदार मनाने स्वागत केले पाहिजे, टीका करणार्‍यांवर सूड उगारू नये.