मलोनी परिसरात बनावट ताडी निर्मिती केंद्रावर कारवाई

0

दोन दुचाकींसह सव्वा लाखाचा साठा जप्त
शहादाः
तालुक्यातील मलोनी परिसरात अवैध ताडीची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दोन मोटरसायकली संशयितरित्या आढळून आल्या. त्या अडविल्यावर त्यात ताडी आढळून आली. त्यावरुन वाहतूक करणार्‍यांना पकडण्यात आले. आरोपींची चौकशी केल्यावर त्यांनी ती ताडी मलोनी परिसरात जॅकवेल वसाहतीत तयार केली जात असल्याचे सांगितले.

बनावट ताडी निर्मितीचा कारखाना नरसिंग गदगोणवार यांचा असल्याचे तपासात उघड झाले असून तो फरार झाला आहे. तसेच किसन शंकर गौड, प्रकाश शंकर चौहान (सर्व रा. शहादा) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत आरोपींच्या ताब्यातून 760 लिटर बनावट ताडी तसेच साहित्य व दोन मोटरसायकली असा 1 लाख 12 हजार 334 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यानंतर जॅकवेल वसाहतीत एका खोलीची झडती घेतल्यावर खोलीत तयार बनावट ताडी, ताडी तयार करण्याकरिता वापरात येणारे साहित्य आढळून आले. बनावट ताडीचे नमुनेे आणि रासायनिक साहित्य फॉरेन्सिक लॅब येथे पडताळणीकरीता पाठविण्यात येणार आहे. तसेच ताडी वाहतुकीकरीता वापरण्यात आलेेली होंन्डा अ‍ॅक्टीवा( क्र.एमएच 39-एस 769) आणि टिव्हीएस विगो कंपनीची मोटरसायकल (क्र. एमएच39-पी 4256) जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई नाशिक विभागाचे विभागिय उपायुक्त प्रसाद सुर्वे, नंदुरबारचे राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली करुन पथकात निरीक्षक मनोज संबोधी, खेडदिगरचे निरीक्षक अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरीक्षक सुभाष बाविस्कर, प्रशांत पाटील, अजय रायते, हर्षल नांद्रे, संजीव भैसाणे, तुषार सोनवणे, राहुल साळवे, धनराज पाटील यांचा समावेश होता. तपास मनोज संबोधी करीत आहे.

अवैध ताडीबाबत माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन
उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सध्या ताडी विक्रीकरीता कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. बनावट/ रासायनिक ताडी सेवनास घातक असल्याने कोणत्याही ठिकाणावरुन खरेदी अथवा सेवन करु नये. नागरिकांनी अशा अवैध ताडीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क विभागाकडे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.