मुरूड जंजिरा । मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन असून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे असून मल्लखांब हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार असल्याचे प्रतिपादन शिव मर्दानी आखाड्याचे संस्थापक किशोर चवरकर यांनी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनानिमित्त मुरूड तालुक्यातील साळाव येथे आयोजित कार्यक्रमात केले. मल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना 29 जानेवारी 1981 रोजी उज्जैन, मध्य प्रदेश येथे झाली. ही राष्ट्रीय संघटना मल्लखांब फेडेरेशन (ीशसव.) इंडिया या नावाने ओळखले जाते. तेव्हापासून आजपर्यंत भारतातील 29 राज्यांच्या राज्य संघटनांची नोंदणी झालेली आहे. प्रतिवर्षी राष्ट्रीय संघटनेच्या वतीने खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. मल्लखांब हा सागवानी किंवा शिसवीच्या लाकडाचा एक स्तंभ असतो. याची उंची सुमारे साडेआठ फूट असते. हा खांब दंडगोलाकार, सरळ, गुळगुळीत व वर टोकाच्या बाजूला निमूळता असतो. या प्रकाराला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत पक्का बसवलेला असतो.
मराठी मातीत जन्माला आलेला अस्सल मराठमोळा खेळ अशी ओळख लाभलेला मल्लखांब दुसरा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करत असताना शिव मर्दानी आखाड्याचे प्रशिक्षक शुभम चवरकर यांनी मल्लखांबाविषयीच्या प्रात्यक्षिके यांचे आयोजन केले आहे हे कौतुकास्पद आहे. असे किशोर चवरकर यांनी यावेळी केले.शिव मर्दानी आखाड्याचे प्रशिक्षक शुभम चवरकर यांनी सांगितले की, आमच्या आखाड्याची स्थापना ही 1 ऑगस्ट 2013 तोजी मुरूड तालुक्यातील साळाव येथे करण्यात आली. या आखाड्याची स्थापना करण्याची प्रेरणा ही महादेव चवरकर यांच्याकडून मिळाली असून हा आखाडा किशोर चवरकर यांच्या सहकार्याने स्थापन केला आहे. आज मल्लखांब प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी आखाड्यातील तीस प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला आहे. मल्लखांब या खेळाचा उदय दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट्टदादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायामप्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती. मल्लखांबाचा तोच खेळ आज जगातल्या अनेक शहरांमध्ये पोहोचला आहे. ओडिशा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराजवळ पंधराव्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला.ओडिशा येथे स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरू आहे. महाराष्ट्रात या खेळाची नोंद पेशवेकालावधीनंतर मोठ्या प्रमाणात आढळते. पेशव्यांनी देशभरात कुस्तीचे आखाडे सुरू केले. या आखाड्यांमध्येच त्यांनी मल्लखांबांचीही स्थापना केली. या खेळाचा आणखी प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून, गेल्या वर्षीपासून 15 जूनला मल्लखांब आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येत आहे.
’मल्लखांब परिपूर्ण असा खेळ आहे. तो ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट व्हावा अशी मागणी आमच्या आखाड्यामार्फत केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते यांच्याकडे करणार असल्याचेही शुभम चवरकर यांनी सांगितले. यावेळी मुलांच्या मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक-युवराज सुतार, द्वितीय क्रमांक-रोहित मुंबईकर, तृतीय क्रमांक-सार्थक मांढरे यांनी तर मुलींच्या रोप(दोर) मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक-प्राची कांबळी, द्वितीय क्रमांक-श्रुती चवरकर, तृतीय क्रमांक-रिया कांबळी यांनी मिळवला आहे.