मल्ल्यानंतर ‘डायमंड किंग’चे चुना लावून पलायन!

0

पंजाब नॅशनल बँक आता वादाच्या घेर्‍यात सापडली आहे. बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत तब्बल 11 हजार 360 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. मात्र, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिर्‍याचे व्यापारी नीरव मोदी सध्या देशात नाही, तर परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. गेली सात आठ वर्षे ही फसवणुकीची प्रोसेस चालू होती आणि त्याला कोणी उघड केले नाही याचा अर्थ ही मोठी भय कथा असल्यासारखे वाटते. हे सहज झाले असे अजिबात वाटत नाही. नक्कीच यात मोठी साखळी आहे. 11 हजार 360 कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेला हा नीरव मोदी भारतातील मोठा हिरे व्यापारी आहे. त्याला भारतातील ’डायमंड किंग’ म्हटले जाते. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी याची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे. नीरव मोदी यांची फाइव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्यांनी ’नीरव मोदी डायमंड ब्रँड’ या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरूम सुरू केले आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदीची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ’नीरव मोदी डायमंड ब्रँड’ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदींचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदीने सुरुवातीचे शिक्षण अमेरिकेत घेतले. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर त्याने व्यवसाय सुरु केला.

ज्या शाखेत हा घोटाळा झाला त्या शाखेचे चांगल्या परफॉर्मन्ससाठी कौतुक झालेले आहे. परंतु, गेली 10 वर्षे बँकांमध्ये कर्मचारी भरती झालेली नाही. मग काही टेंपररी आणि अकुशल कर्मचार्‍यांकडून काम करून घेतले जाते, अशा प्रकारामुळे ही बराचसा गलथान कारभार होतो. त्याचाही या फेलीवरमध्ये थोडाफार वाटा असवाच. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही बँक देशाच्या सेवेत कार्यरत आहे. 122 वर्षे जुनी पीएनबी ही देशातली सर्वात मोठी दुसरी बँक आहे. पीएनबीचे एकूण 10 कोटी खातेधारक आहेत, तर देशात बँकेच्या एकूण 6941 शाखा, 9753 एटीएम सेंटर आहेत. पीएनबीचा 2017 या वर्षातील निव्वळ नफा 904 कोटी रुपयांचा आहे आणि एकूण एनपीए 57 हजार 630 कोटी रुपये आहे. देशातून फरार असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याकडे पीएनबीचे 815 कोटींचे कर्ज आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानंतर पीएनबी देशातली सर्वात मोठी दुसरी बँक आहे. याआधी विजय मल्ल्या या बड्या उद्योजकाने असाच चुना लावला होता. आजही ते पैसे वसूल झालेले नाहीत.

बँक गॅरंटी आणि लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचे पत्र याबाबतची नियमावली एका समितीच्या शिफारशींमध्ये आरबीआयने केलेली आहे. त्याची अंमलबजावणी झाली का? हे पाहावे लागेल. यात आता आरबीआयच्या कारवाईच्या प्रवेशानंतर लगेच पैसे रिकव्हर होतील याबाबत शंका आहे. त्यामुळेे आता हे पैसे वसूल कुठून कसे होणार, यावर प्रश्‍नचिन्ह आहे. यातून काही धडा घेण्याची गरज आहे. हा चुना लावण्यात कोण कोण आहेत? नीरव मोदीला भारतात आणता येणार का? त्यावर कारवाई होणार का? पंजाब नॅशनल बँकेचा मोडलेला आर्थिक कणा पुन्हा सावरणार का? असे अनेक प्रश्‍न या घटनेत उभे राहिले आहेत.

– राजा आदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111