मल्ल विजयी चौधरी ठरले ‘कन्हैया केसरी गदेचे’ मानकरी

पारनेर : तालुक्यातील निघोज येथील कन्हैय्या उद्योग समूहाचे उद्योजक मच्छिंद्र लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कुस्ती स्पर्धेत कन्हैया कसेरी गदेचे मानकरी
तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे, पुण्याचे सहायक पोलिस आयुक्त तथा पहिलवान विजय चौधरी ठरले. तीन लाख रुपयांचे बक्षीस व मानाची कन्हैया केसरी गदा देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

अत्यंत रोमहर्षक सामन्यात चौधरींचा विजय
अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात पहिलवान विजय चौधरी यांनी भारत केसरी पहिलवान अरविंद सिंग यांना अस्मान दाखवले. यावेळी उपस्थित कुस्ती शौकिनांनी मैदान डोक्यावर घेत एकच जल्लोष केला. अंतिम सामन्यात आमदार निलेश लंके व पहिलवान अमोल लंके यांनी पंच म्हणून काम पाहिले.

यांची होती उपस्थिती
उद्योजक मच्छिंद्र लंके यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील निघोज येथे कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार लंके, पद्मश्री पोपटराव
पवार, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण झाले. गोकूळ वस्ताद तालमीचा पहिलवान, उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार व पहिलवान अक्षय शिंदे यांच्यात झालेली दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सुटली. तिसर्‍या क्रमांकासाठी राष्ट्रीय खेळाडू सुदर्शन कोतकर व महाराष्ट्र चॅम्पियन महारुद्र काळे यांच्यात लढत झाली. सुदर्शनने या लढतीत बाजी मारली. अमोल मुंडे, केवल भिंगारे, कुमार शेलार, ऋषी लांडे, अनिल लोणारे यांनी नेत्रदीपक लढतीत बाजी मारून प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेत एकूण वीस कुस्त्या झाल्या. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. युवराज केचे (सोलापूर) यांनी निवेदन केले.

हलगी वादकांनी भरला स्पर्धेत रंग
अकलूज येथील जय बजरंग मित्रमंडळाच्या हलगी वादकांनी स्पर्धेत रंग भरला. पहिलवान अमोल लंके, पहिलवान भीमा लामखडे यांनी स्पर्धा आयोजनासाठी तसेच मैदान तयार करण्यासाठी परीश्रम घेतले. पारनेर तालुका पत्रकार संघाचा स्पर्धेच्या आयोजनात मोलाचा सहभाग होता. उद्योजक सुभाष झिने, माजी महापौर अनिल शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य माधवराव लामखडे, उद्योजक नानासाहेब गाडे, प्रभाकर कवाद, बाळासाहेब लामखडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उद्योजक सुरेश पठारे व शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांनी केले.