जळगाव । लाइफ इज ब्यूटीफूल फाऊंडेशन व मल्हार कम्युनिकेशन्स द्वारा आयोजित मल्हार हेल्प-फेअर या सेवाभावी संस्थांच्या प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वाकडे आली असून जिल्हाभरातील सेवासंस्था व व्यक्तीची माहिती या प्रदर्शनात एकाच छताखाली खान्देशकरांना उपलब्ध होणार आहे. 19 ते 21 जानेवारी 2018 या दरम्यान येथील सागर पार्क येथे दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत सेवाचा हा कुंभमेळा भरणार आहे. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता याचा उद्घाटन जळगाव शहर व जिल्हाभरातील अनेक मान्यवरांसह या उद्घाटन सोहळ्यास अमरावती येथील प्रयास या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अविनाश सावजी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या हेल्पफेअरसाठी आलेल्या शेकडो आवेदनांमधून निवड समितीने सामाजिक कार्य करणार्या निवडक 50 संस्थांची व 40 सेवाव्रती व्यक्तींची त्यांचे कार्य, कार्याचे वेगळेपण व त्या कार्याचा समाजावर झालेला प्रभाव या निकषांवर निवड करून त्यांना हेल्प फेयरमध्ये विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हेल्प-फेअरची उदि्दष्ट्ये
जिल्ह्यातील उत्कृष्ठ सेवाभावी संस्था समाजासमोर आणणे, सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करणे, शासकीय योजनांची माहिती देणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवादातृत्व भाव जागृत करणे, कार्य विविध समाजांची समाजासाठी होत असलेली मदत लोकांसमोर आणणे आदींचा समावेश होणार आहे. दरम्यान आदिवासी क्षेत्रात औषधी व कापड वितरणासाठी ज्यांना आपल्याकडील उरलेल्या औषधी व ऑर्थोचे साहित्य, कपडे व अन्य आवश्यक वस्तू द्यावयाच्या असतील ते या प्रदर्शनीत आणून देऊ शकतील. या क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थेद्वारे हे कार्य तडीस नेण्यात येणार आहे असे हेल्प-फेअरच्या आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. समाजातील सधन व संवेदनशील जनतेत दातृत्व भाव जागे करून समाज ऋण फेडण्यासाठी प्रवृत्त करणे लहान मुलांमध्ये जॉय ऑफ गिव्हिंग, शेअरिंग संस्कारांचे बीज रुजविणे हे या हेल्प फेयरच्या माध्यमातून साध्य होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने येऊन सुखाचे बीज घेऊन जाण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.