‘मविप्र’च्या ताब्यावरून भोईटे-पाटील गटात हाणामारी

0

जळगाव । बहुचर्चित जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेत ताब्या घेण्यावरून पुन्हा आज पाटील-भोईटे गट समोरासमोर आले होते. दुपारी दोन्ही गटात जोरदार हाणामारी होवून दगडफेक झाली. यात भोईटे गटातील चौघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावावर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे परिसरात गोंधळ होवून तणावा निर्माण झाला होता. याघटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात दोन्ही गटाविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.दरम्रान जिल्ह्यात शैक्षणिक आलेख उंचावणार्‍रा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्रा संदर्भात संबंधित कारदेशीर आस्थापना व पोलिस प्रशासनाच्रा समन्वराच्रा अभावामुळे वाद चिघळला आहे.

पत्रामुळे ताबा घेण्यावरुन झाला वाद
मविप्र संस्थेवर 17 रोजी पाटील गटाने ताबा घेतला. त्यानंतर 18 रोजी दिवसभर पाटील गटाने कामकाज पाहिले. दरम्यान तहसिलदार यांनी ताबा घेण्याबाबत कुठल्याही गटाला आदेश दिले नसल्याने स्पष्ट केल्याने आज सकाळी ताबा घेण्यावरून नरेंद्र पाटील व भोईटे गट समोरासमोर आले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थीची भुमिका घेतल्याने वाद टळला होता.

रस्त्यावर हाणामारी अन् तुफान दगडफेक
मविप्र संस्थेच्या कार्यालयात नरेंद्र पाटील गटाचे कामकाज सुरु असतांना भोईटे गटाचे काही कार्यकर्त याठिकाणी आले. त्यामुळे पुन्हा भोईटे व पाटील गट समोरासमोर भिडले. सुरवातीला भोईटे गटाच्या समर्थकांनी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नरेंद्र पाटील समर्थक असलेले रवि देशमुख यांच्यासह सहकार्‍यांनी मविप्र संस्थेच्या कार्यालयाजवळ येवून भोईटे गटाच्या चौघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जयेश बाबुराव भोईटे (वय-30) रा. भोईटे नगर, उमेश दगडु धुमाळ (वय-40) रा. गणेश कॉलनी, गणेश दगडु धुमाळ (वय-34), सुनिल धोंडू भोईटे (वय-52) रा. कल्याणी नगर, अजय देविदास विसपुते (वय-36) रा. भोईटे नगर हे पाचही जण जखमी झाले.

असा उद्भवला वाद
जळगाव । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेवरील ताब्या घेण्यासाठी नरेंद्र पाटील व भोईटे गटात वाद सुरु आहे. मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी संस्थेच्या मुख्य कार्यालयात दुपारी 4 वाजेच्या दोन्ही गटात जोरदार वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना कार्यालयात जाण्यास मज्जाव घातला होता. तेव्हापासून ताबा घेण्यावरून हे प्रकरणच चांगलाच पेटले होते. एका जणाला रस्त्यावर आडवा पाडून 15 ते 20 जणांच्या जमावाने लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान, प्रचंड जमाव झाल्याने त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान जिल्हापेठ पेलिसांनी ताबा देण्याबाबत निर्णयासाठी सीआरपीसी कल 145 नुसार तहसिलदारांकडे प्रस्ताव पाठविला होता. दरम्यान तहसिलदार निकम यांनी हा प्रस्ताव फेटाळल्याने रविवारी 17 रोजी नरेंद्र पाटील गटाने संस्थेवर ताबा घेतला होता. त्यानंतर 18 रोजी तलसिलदार यांनी संस्थेचा ताबा कोणाकडे द्यावा याबाबत कुठलेही आदेश काढलेले नसल्याबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र दिले होते. या आदेशाची प्रत जिल्हा पेठ पोलिसांना देण्यात आली. 24 तासात दोन वेगवेगळे आदेश झाल्याने संभ्रमाचे वातावरण झाले. त्यामुळे भोईटे गट मंगळवारी सकाळपासूनच संस्थेच्या आवारात दाखल झाला. भोईटे गटाचे कार्यकर्ते आल्याचे समजताच नरेंद्र पाटील गटाचेही संचालक व कार्यकर्ते महाविद्यालयात दाखल झाले. संभाव्य वाद लक्षात घेता पाटील गटाने संस्थेच्या कार्यालयाला दोन्ही बाजुंनी कुलुप लावले. हा प्रकार समजल्यानंतर भोईटे गटाच्या काही जणांनी मुख्य रस्त्यावरील कार्यालयाच्या दरवाजाला सील लावून साखळदंडाने दुसरे कुलूप लावल्याने हा वादी उफाळून आला होता.

पळापळ व दहशतीचे वातावरण
न्यायालय रस्त्यावरुन भोईटे गटाच्या एका जणाने संस्थेच्या कार्यालयावर दगडफेक केली. हा प्रकार पाहिल्यानंतर बाहेर थांबलेल्या पाटील गटाच्या समर्थकांनीही दगडफेक करायला सुरुवात केली. 15 ते 20 जणांच्या जमावाने पकडून रस्त्यावर आडवा पाडला, त्यानंतर बुटाच्या लाथांनी जबर मारहाण करायला सुरुवात केली. जमावातील प्रत्येक जण मिळेल त्या पध्दतीने मारहाण करीत होते. मुख्य रस्त्यावर झालेली दगडफेक व हाणामारी पाहून सर्वत्र पळापळ झाली. परिसरातील नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. न्यायालय व गणेश कॉलनीकडे जाणारा रस्ता 20 मिनिटासाठी बंद झाला होता.

जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज
दगडफेकीच्या घटनेमुळे मविप्र संस्थेच्या कार्यालयासमोर दोन्ही गटाचा जमाव जमला होता. दरम्यान पुन्हा वाद वाढू नये म्हणून जिल्हापेठ पोलिसांनी पाटील गटाला तात्काळ महाविद्यालयाच्या गेटबाहेर जाण्याचे सांगितले. त्यानंतर जमाव वाढत असल्याने पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यानंतर डीवायएसपी सचिन सांगळे यांनी धाव घेवून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढील कारवाईसाठी पोलिस निरीक्षक गायकवाड यांना सुचित केले.

पोनि गायकवाडांचा निषेध
पाटील गटाचे काही संचालक व काही समर्थक नुतन मराठाच्या कार्यालयात असतांना पोलिस निरीक्षकांनी त्यांना तात्काळ बाहेर काढण्याचे सांगितले. त्यानंतर पाटील गटाचे कार्यकर्ते बाहेर जात नसल्याने पोलिस निरीक्षक यांनी शिवीगाळ केल्याने पाटील गटाने त्यांचा निषेध करून घोषणाबाजी केली.

दोन दिवसांपूर्वी संस्थेचे कामकाज सुरळीत सुरु होते. आज सकाळपासून भोईटे गटाचे कार्यकर्त संस्थेवर ताबा घेण्यासाठी प्रयत्न करीत होते. दुपारी काही कार्यकत्यार्ंनी संस्थेच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यांच्याविरूध्द रितसर तक्रार देणार असल्याने संस्थेचे संचालक अ‍ॅड. विजय पाटील यांनी सांगितले.
-अ‍ॅड.विजय पाटील, संचालक, मविप्र

या घटनेप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हाणामारी व दगडफेक करणार्‍या दोन्ही गटाविरुध्द तातडीने गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. पुन्हा वाद होवून नये यासाठी संस्थेच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
– सचिन सांगळे, डीवासएसपी, जळगाव