जळगाव: माझे सासरे स्व.आमदार मुरलीधर पवार हे अनेक वर्षे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन होते, त्यांच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठी संस्था उभारण्यात आली. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या अनेक शाखा त्यांच्या काळात स्थापन झाल्या. मराठा समाजातील अनेकांना नोकरी देण्याचे काम त्यांनी केले. आजपर्यंत आमच्या कुटुंबीयांवर राजकिय जीवनात आर्थिक भ्रष्टाचाराचा तसेच कुठेही काही नियमबाह्य कामगिरी केल्याचे आरोप नाही. मात्र आता राजकीय हेतूने प्रेरित होऊन आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राजकीय दबावात येऊन गुन्हा दाखल करणे हे दुर्दैवी असल्याचे आरोप मवीप्रच्या संचालिका सोनल संजय पवार यांनी केले.
माझे पती संजय मुरलीधर पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत, तसेच सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा बँक, महाराष्ट्र राज्य कापूस फेडरेशन, जिल्हा कॉटन मार्केटिंग फेडरेशन, जिल्हा सहकार बोर्ड अशा अनेक सहकार क्षेत्रात ते काम करीत आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मागितली आहे म्हणून विधानसभेचे पूर्वी राजकीय विरोधकांकडून असे खोटे प्रकार सुरु असल्याचे आरोप सोनल पवार यांनी केले आहे. भोईटे गट काही राजकीय मंडळींना हाताशी धरून असे प्रकार करीत असल्याचे आरोप त्यांनी केले आहे.
याबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय व राज्य महिला आयोग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे असल्याचे सोनल पवार यांनी सांगितले.