भुसावळ। शेतकरी सध्या शेतात उन्हाळी कामासाठी उन्हातान्हात राबून शेती मशागतीची कामे करत आहे. त्यासाठी यंदाच्या खरीप हंगाम पेरणीसाठी शेतकर्यांनी पैशांची जमवाजमव केली असून शेतकर्यांनी हंगामासाठी बँकांत ठेवलेला पैसा त्यांना वेळेवर मिळेल का? याबाबत बळीराजाकडून चिंता व्यक्त होत आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून एटीएम बंद अवस्थेत असल्याने अनेकांना पैसे काढणे कठिण बनले आहे.
बियाणे खरेदीसाठी पैशांची उपलब्धता होईना
खरीप हंगामासाठी मशागत झाल्यास पावसाच्या सरी कोसळल्यानंतर शेतकर्यांना खरीप हंगामाच्या पेरणीला लागावे लागते. त्यासाठी बी-बियाणे, खते, किटकनाशके आदी वस्तू विकत आणाव्या लागतात. म्हणून सुरुवातीपासून शेतकर्यांनी जमवाजमव करून ठेवलेले बँकेतील पैसे वेळेवर त्यांच्या खरीपाच्या पेरणीसाठी मिळतील का याबाबत शेतकर्यांमध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सध्या बँकांमध्ये एटीएममध्ये चलन तुटवडा निर्माण झालेला असून शेतकर्यांना शेतीसाठी एकरकमी पैसा हातात असावा लागतो म्हणून पैसा-पैसा जमा करून शेतकरी आपला पैसा बँकेत ठेवतो. परंतु हा पैसा त्याच्या कामासाठी वेळेवर मिळेल की नाही या विषयी शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
ग्राहकांची होतेय गैरसोय
शहरातील विविध बँकांचे एटीएम गेल्या पंधरा दिवसांपासून बंद पडल्याने अनेकांना मोठा मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील एटीएम बंद पडल्याने स्थानिकांसह बाहेरगावच्या नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. बँकेच्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी बँकात कामे, नोकरी बुडवून मोठी गर्दी करावी लागत आहे. चलन तुटवड्यामुळे सर्वसामान्यांसह व्यवसायीक नोकरदार वर्गांना मोठा फटका बसत असून बँकेने तात्काळ एटीएममध्ये पैसा उपलब्ध करुन होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.