मशिदीच्या मनोरुग्ण व्यवस्थापकाच्या चाकूहल्ल्यात 20 जणांचा मृत्यू

0

इस्लामाबाद । पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात एका मशिदीमध्ये मनोरुग्ण व्यवस्थापकाने केलेल्या चाकूहल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश असून पोलिसांनी हल्लेखोरासह त्याच्या पाच साथीदारांना अटक केली आहे. हल्लेखोर मनोरुग्ण असल्याचे समजते. पापमुक्तीसाठी मारहाण मान्य- सुरगोढा येथे मोहम्मद अली गुज्जर गावात एक दर्गा आहे.

या दर्ग्याच्या व्यवस्थापकाने साथीदारांसह 20 जणांची हत्या केली. हत्येपूर्वी सर्वांना गुंगीचे औषध देण्यात आलेे नंतर कपडे काढून सर्वांना दांडक्याने मारहाण करण्यात आली आणि मग चाकूने वार करण्यात आले. हे सर्व जण पंजाबमधील विविध भागांमधून दर्ग्यात आले होते. तीन जण जखमी झाले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती गंभीर आहे. दर्ग्यातील व्यवस्थापक अब्दुल वहीद, युसूफसह अन्य तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ल्याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. संशयितापैकी एक जण पाकिस्तानमधील निवडणूक आयोगात कामाला आहे. या दर्ग्यामध्ये पापमुक्तीसाठी अनेक जण येतात. दर्ग्यातील कर्मचार्‍याकडून काठीने मार खाल्ल्यानंतर पापे धूतली जातात अशीही धारणा आहे. लवकरच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.