नवी दिल्ली:देशभरातील मशिदीत मुस्लीम महिलांना प्रवेश द्यावा आणि त्यांना प्रार्थना करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी झाली असून सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस देखील पाठविली आहे. न्या. एस ए बोबडे यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरु असल्याने या याचिकेवर सुनावणी घेऊ, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
पुण्यातील एका मुस्लीम दाम्पत्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मुस्लीम महिलांना मशिदीत प्रवेश द्यावा आणि त्यांना मशिदीत प्रार्थना करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. कुराण आणि मोहम्मद पैगंबर यांनी मशिदीत महिलांना प्रवेश करण्यास विरोध दर्शवल्याचे दस्तावेज नाहीत, असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले आहे. महिलांना मशिदीत प्रवेश नाकारण्याचा सध्याचा नियम हा घटनाबाह्य असून यामुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते. विविध मशिदींमधील मौलानांनी आमच्या मागणीला विरोध केल्याने शेवटी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.