मशीनद्वारे रासायनिक खतांच्या विक्रीबाबत प्रशिक्षण

0

शिंदखेडा। शेतकर्‍यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री डीबीटी प्रणालीद्वारे इ-पीओएस मशिनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. त्याकरीता शेतकर्‍यांना आपल्या आधार क्रमांक व अंगठ्याच्या ठशाच्या आधारेच अनुदानित रासायनिक खते खरेदी करावी लगाणार आहेत. या प्रणालीद्वारे खतांचे अनुदान वितरणात सुसुत्रता आणणे व खतांचा काळाबाजार, साठेबाजी रोखणे शक्य होणार आहे. इ-पीओएस मशिनच्या वापराबाबत शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील रासायनिक खते विक्रेत्यांचा उपविभागस्तरीय प्रशिक्षणवर्ग शिंदखेडात आयोजित केला होता.

…तर शाश्‍वत शेतीचे स्वप्न साकार होणे सहज शक्य
या प्रशिक्षणवर्गाकरीता शिंदखेडा तालुक्यातील 83 व शिरपूर तालुक्यातील 58 विक्रेत्यांनी आपला सहभाग नोंदविला. रासायनिक खत उत्पादक 7 कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधीदेखील प्रशिक्षण वर्गास उपस्थित होते. शिंदखेडा पंचायत समितीचे खत निरीक्षक डॉ.तुषार तिवारी यांनी डीबीटी प्रणालीबाबत मार्गदर्शन केले. प्रशासनाबरोबरच रासायनिक खत उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांना डीबीटी प्रणाली यशस्वी करण्याकरीता महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. तसेच रासायनिक खतांच्या असमतोल वापरावर नियंत्रण आरोग्यपत्रिकांच्या आधार लिंकींगमुळे साध्य होऊ शकेल व लवकरच 7/12 आधार क्रमांकाशी जोडला गेल्यास शाश्‍वत शेतीचे स्वप्न साकार होणे सहज शक्य होईल, असे मत प्रतिपादन डॉ.तिवारी यांनी केले. कोरोमंडल इंटरनॅशनल लि.कंपनीचे प्रविण प्रशिक्षक नितीन माधवी यांनी इ-पीओएस मशीनच्या वापराबाबत कृति प्रात्यक्षिक करून दाखविल. शिरपूर तालुक्याचे खत निरीक्षक नानाभाऊ पाटील यांनी विके्रत्यांच्या समस्यांचे निराकरण केले. प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेकरीता धुळे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भालचंद्र बैसाणे, जिल्हा कृषि अधिकारी रोहन भोसले व मोहीम अधिकारी रमेश नेतनराव यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेकरीता कृषि विस्तार अधिकारी योगेश गिरासे, गिरीधर देवरे, विजय जाधव, गणेश पाटील, मुकेश पवार व श्रीमती माळी यांनी परिश्रम घेतले.