पाच वर्षानंतरही ग्रॅच्युएटी नाही : तोडगा न निघाल्यास चेअरमन यांच्या निवासस्थानी आंदोलन छेडण्याचा ईशारा
फैजपूर- मधुकर सहकारी साखर कारखान्यातून सुमारे दोन ते पाच वर्ष कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना ग्रॅज्युएटी तसेच थकीत पगार मिळाले नसल्याने त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केल्याने कारखाना कार्यक्षेत्रासह पदाधिकार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात मधुकर सहकारी साखर कारखाना प्रशासनाला 17 सप्टेंबर रोजी निवेदन देऊन ईशारा देण्यात आला मात्र दखल न घेण्यात आल्याने उपोषण पत्करावे लागल्याचे उपोषणार्थी म्हणाले.
… तर चेअरमन यांच्या दारी कोंडमारा आंदोलन
सेवानिवृत्तांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार गेल्या पाच वर्षांपासून कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवा निवृत्तीनंतर ग्रॅच्युएटी एक महिन्याच्या आत मिळायला हवी होती मात्र ती मिळालेली नाही, वारंवार मसाका कारखान्याकडे पत्रव्यवहार करून कुठलेही उत्तर प्रशासन देत नाही. ग्रॅज्युएटीही सेवानिवृत्त कर्मचार्यांची म्हातारपणाची काठी आहे. दोन दिवसात सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या हक्काची रक्कम व पगार मसाका प्रशासनाने अदा केला नाही तर चेअरमन शरद महाजन यांच्या निवासस्थानी कोंडमारा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुढील इशारा आंदोलकांनी दिला आहे
अधिकार्यांना ग्रॅच्युएटी मात्र कर्मचार्यांच्या तोंडाला पुसली पाने
मधुकर सहकारी साखर कारखान्यात गेल्या एक ते दोन वर्षात सेवानिवृत्त झाले अशा अधिकारी यांना मसाकाने तत्काळ ग्रॅच्युएटी देऊन कष्टकरी कर्मचार्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मसाकात काही कर्मचारी व अधिकारी हे संचालकांचे हितचिंतक आहेत, त्यांना जवळ करून त्यांची रक्कम या संचालकांनी अदा केली. कष्टकरी कर्मचारी यांना न्याय वेगळा आणि संचालकांच्या हितचिंतकांना वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
कार्यरत कर्मचार्यांचे 1 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन
मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कार्यरत कर्मचारी गेल्या 24 महिन्याच्या थकीत पगारासाठी 1 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याकडे सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत नसल्याने कर्मचार्यांमध्ये संतापाची भावना आहे. येत्या 23 रोजी वार्षिक सभा असल्याने ती सभा संचालक यांनाच पार पाडावी लागणार आहे.
यांचा उपोषणात सहभाग
शाममीना भानुदास, आत्माराम तायडे, गौरव भालेराव, रजनीकांत डोळे, मीना पाटील, निर्मला पाटील, सुनीता बाविस्कर, पुष्पलता सोनवणे, अंजना पवार, निर्मला कोळी, मंगला नारखेडे, निर्मला खंडाळे, दिपाली महाजन, भानुदास पाटील यासह सेवानिवृत्त कर्मचारी परीवारासह आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत.