मसाकाला राज्य शासनाकडून हकहमी मिळणार ; तीन लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट

0

आमदार हरीभाऊ जावळे यांची ग्वाही ; 43 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ; शासन एफआरपीप्रमाणे रक्कम अदा करणार -चेअरमन शरद महाजन

फैजपूर- अनेक अडचणींमधून मार्ग काढत मसाका कारखान्याचा बॉयलर पेटला असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्यातून राज्य शासन लवकरच कारखान्याला थकहमी देईल व तीन लाख मेट्रीक टन उसाचे गाळप निश्‍चित होईल, असा विश्‍वास आमदार हरीभाऊ जावळे यांनी येथे व्यक्त केला. त्यांच्या हस्ते 43 व्या गळीत हंगामाचा रविवारी शुभारंभ झाला. याप्रसंगी आमदार जावळे बोलत होते.

सभासद व उत्पादकांच्या विश्‍वासाने कारखाना सुरू -माजी आमदार
माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, कारखाना सभासद व ऊस उत्पादकांनी दाखवलेल्या विश्‍वासामुळे कारखाना सुरू आहे. आर्थिक अडचणी असल्यातरी आगामी काळात कारखान्याला निश्‍चित समृद्धी येईल, वाईट काळात सर्वांनी केेलेले सहकार्य करून प्रकल्प टिकवण्याची बाब गौरवास्पद असल्याचे ते म्हणाले.

लवकरच थकहमी मिळण्याचा विश्‍वास -चेअरमन
चेअरमन शरद महाजन यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, अनेक अडचणीतून मार्ग काढून कारखाना सुरू करण्यात आला असून सर्वच लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून कारखान्याला राज्य शासनाकडून लवकरच थकहमी मिळणार आहे. 15 दिवस आधीच कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणे गरजेचे होते मात्र आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण सुरू असल्याने विलंब झाला. दुष्काळी स्थितीमुळे जलपातळी खालावली असतानाही ऊस उत्पादकांनी ऊस जगवला असून त्यांनी तो गाळपासाठी आपल्याच कारखान्याला द्यावा. शासनाच्या एफआरपीप्रमाणे एक हजार 921 रुपये मेट्रीक टन भाव देण्यास कारखाना प्रशासन बांधील आहे.

गव्हाणीत मोळी टाकून गाळपाचा शुभारंभ
प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून 43 व्या गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी संचालक अनिल महाजन व भागवत पाचपोळे यांच्या हस्ते वजन काट्यांची तसेच बैलगाडीची पूजा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. माजी खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे, माजी आमदार अरुण पाटील यांच्यासह गटनेते प्रभाकर सोनवणे, उल्हास निंबा चौधरी, भारती नितीन चौधरी, आरती शरद महाजन, सविता भालेराव, भानुदास चोपडे, केतन किरंगे, नारायण चौधरी, देवेंद्र बेंडाळे, विलास चौधरी, दिनकर पाटील, रूपा महाजन, गोवर्धन बोरोले, अरुण गोविंद महाजन, विजय पाटील, नितीन चौधरी, किशोर वाघुळदे, प्रमोद भिरूड, भागवत पाटील, नरेंद्र नारखेडे, प्रशांत पाटील, अनिल महाजन, रमेश महाजन, सुरेश पाटील, नथू रमजान तडवी, संजय चुडामण पाटील, भागवत शामराव पाचपोळ, शालिनी हेमंत महाजन, माधुरी प्रमोद झोपे, निर्मला राजेंद्र महाजन, तात्यासाहेब पंढरीनाथ निकम, तेजेंद्र दिनकर तळेले, किरण चौधरी यांच्यासह कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक, शेतकरी सभासद, ऊस वाहतूकदार ठेकेदार आदींची उपस्थिती होती. आभार व्हा.चेअरमन भागवत पाटील यांनी मानले.