फैजपूर। येथील मधुकर साखर कारखान्यात कामगारांनी थकीत पगारासाठी 30 मे पासून कामबंद आंदोलन पुकारलेले होते. ते अखेर रविवार 11 रोजी सकाळी 9.30 वाजता मसाका संचालक मंडळ आणि कामगार युनियन पदाधिकारी व सदस्य यांच्यात झालेल्या चर्चेत कायम कामगारांचे 3 महिन्यांचे पगार देण्याचे ठरले. त्यापैकी डिसेंबर 2015 चा एक पगार, ट्रेनी कर्मचार्यांचा जानेवारी 2017 चा तसेच ट्रेनी रोजंदारी कर्मचार्यांचे माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2017 या तीन महिन्यांचे रोजंदारीचे पगार गुरुवार 15 जून पर्यंत बँकेत वर्ग करण्यात येईल.
स्टॅम्पवर लिहून घेतला करारनामा
तसेच जानेवारी 16, फेब्रुवारी 16 या दोन महिन्यांचा पगार, हंगामी कामगारांचा सन 2015 चा 30 टक्के रिटेंशनमध्ये कोणतीही कपात न करता तसेच दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार ट्रेनी कर्मचार्यांचे व हंगामी कर्मचार्यांचे बुडीत रजेचे पगार, तीन महिन्यांची एलआयसी, तीन महिन्यांची बचत तसेच दोन महिन्यांचा पीएफ, अंतरीम कर्जातून तांत्रिक अडचणी पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष बँकेतून उचल मिळाल्यावर, त्यात कमी पडणार्या रकमेची उपलब्धता करुन त्वरीत अदा करण्यात येईल, असा स्टॅम्प व्यवस्थापनाने संघटनेला लिहून दिल्यावर सोमवार 12 पासून कामबंद आंदोलन मागे घेवून कारखान्याचे पूर्ववत कामे सुरु होतील. करारनामा स्टॅम्पवर चेअरमन, कार्यकारी संचालक, उपस्थित सर्व संचालक, कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सह्या आहेत, असे कामगार संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी व सदस्य यांनी निवेदनात म्हटले आहे.