चेअरमन शरद महाजन म्हणाले कारखान्याकडे आवक नाही
फैजपूर (नीलेश पाटील)- जिल्ह्यात नावलौकिक असलेला मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे 20 महिन्यांपासून पगार थकीत असल्याने कामगारांनी सोमवारी तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या 20 महिन्यांच्या थकीत वेतनासाठी सोमवारी चेअरमन शरद महाजन व संचालकांपुढे कामगारांनी तीव्र भावना प्रकट केल्या. वेतनासाठी काहीतरी ठोस भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी कामगारांनी केली. मधूकरच्या कामगारांचे 20 महिन्यांपासूनचे पगार व अन्य देणी थकलेली आहे. लग्नसराई, आजारपण, मुला-मुलींचे प्रवेश प्रक्रिया व जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना कामगारांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त कामगार व कामगार संघटनेचे पदाधिकारी प्रशासकीय इमारतीमध्ये एकत्र जमा झाले. यावेळी कामगारांनी सोमवारी चेअरमन शरद महाजन व कार्यकारी संचालक महेश सगरे यांच्यासमोर थकीत वेतनासाठी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी चेअरमन महाजन, कामगार व संघटनेचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. कार्यकारी संचालक सगरे यांनी कारखान्यासमोरील परिस्थितीची माहिती दिली तर महाजन यांनी कामगारांना पगारासाठी कारखान्याकडे आवक महत्वाची असून अवाक निर्माण झाली तर पगार केले जातील, असे कामगारांना सांगितले. यावर कामगारांचे समाधान झाले नाही. यावर कामगार संघटनेचे पदाधिकारी आपल्या थकीत वेतनासाठी ठोस निर्णय घेण्याचा आग्रही केला. यावर चेअरमन महाजन यांनी लवकरच संचालक मंडळाची बैठक घेवून 31 मे पर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी संचालक नितीन चौधरी, सचिव तेजेंद्र तळेले, यज्ञश्वर अत्तरदे, कामगार संघटनेचे अध्यक्ष गिरीश कोळंबे, सचिव एकनाथ लोखंडे व कामगार उपस्थित होते.
राज्य शासनाने कारखान्यासाठी पॅकेज जाहीर करावे
साखर उद्योग आर्थिक अडचणीत आलेला आहे सातत्याने साखरेचे भाव कोसळत आहे त्यामुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे राज्य शासनाने कारखान्यासाठी पॅकेज द्यावे व कामगारांच्या आर्थिक उपलब्धतेनुसार पगार देण्यात येईल, असे मसाका चेअरमन शरद महाजन म्हणाले.