मस्कावद बुद्रूकच्या तरुणावर हल्ला

0

सावदा- कामावरून कमी केल्याचा राग आल्याने लक्ष्मण शिवा सपकाळे याने मुकेश अशोक कोळी याच्या पोटावर चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना 29 सप्टेंबरला सायंकाळी 7.30 वाजता मस्कावद बुद्रूक येथे घडली. मस्कावद बुद्रूक येथील घटनेतील आरोपी लक्ष्मण व जखमी मुकेश हा अनेक वर्षांपासून एका ठिकाणी केळीचे घड भरण्याचे काम करत होते. मात्र, सहा महिन्यांपासून लक्ष्मण याला मालकाने कामावरून काढून टाकले होते. मुकेश याच्या सांगण्यावरूनच आपल्याला कामावरून कमी केल्याच्या रागापोटी लक्ष्मण सपकाळे या युवकाने मुकेशच्या (32) पोटात व डाव्या हाताच्या पंजावर चाकू सारख्या तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यात जखमी मुकेशला जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पोलिसांनी हल्लेखोर लक्ष्मण सपकाळे यास अटक केली. याप्रकरणी संदीप अशोक कोळी यांच्या तक्रारीनुसार सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एपीआय राहुल वाघ तपास करत आहे.