मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना झाल्याच्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. भाजप नेते माजी खासदार उदयराजे भोसले यांनी शिवसेनेवर आरोप केले. तसेच शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना करा असा सल्ला देखील दिला होता. याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. उदयराजे भोसले यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे विधान केले. राऊत यांच्या या विधानावर आता भाजपा नेत्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ”छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची साताऱ्याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे. त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही. सत्तेसाठी लाचारी करताना उठसूठ महाराजांच्या घराण्याचा अपमान केलात, तर महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल”, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच, भाजपच्यावतीने एक पत्रकही जारी करण्यात आलं आहे.
उदयनराजेंवरील वक्तव्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून राऊत यांना इशारा देण्यात आला आहे. तुम्ही राजकारणात कोणाचे नाव घेऊ आहात हे तपासा. छत्रपतींच्या घराण्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्यास त्याला सोडणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी संजय राऊत यांना दिला. त्यानंतर, आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही परिपत्रक जारी करत छपत्रतींच्या घराण्यासंदर्भात अपशब्द कदापि खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे.