फैजपूर:- खंडेराव देवस्थानचे महंत घनश्याम दासजी महाराज यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सोमवारी सकाळी 11 वाजता नगरपालिका समोर उपोषण छेडले होते. नगरपालिका मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी उपोषणाची सांगता झाली. सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी व पालिका कर्मचार्यांनी लिंबू सरबत देऊन उपोषण सोडवले.
पदाधिकारी व अधिकार्यांवर महंतांचे आरोप
महंत घनश्याम दासजी यांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे व नगरसेवक हेमराज चौधरी यांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिली मात्र पोलिसांनी राजकीय दबावात येऊन कारवाई केली नाही, खंडेराव वाडीतील मंगल कार्यालयाच्या दक्षिणेकडील भिंतीला लागून नगरपरीषदेने तीन फूट रुंद व पाच फूट खोल गटार कोणतेही टेंडर न काढता 400 ते 500 फूट लांब काढलेली असून त्यात कॉलनीतील घाण पाणी सोडले जाते, पाण्यामुळे मंगल कार्यालयाच्या भिंतीस धोका निर्माण झाला आहे. पालिकेकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. महंतांसोबत शाम इंगळे, शांताराम तायडे व शेख युनूस मोमीन यांनी पाठींबा दिला आहे.
उपोषण सोडण्यास नकार
महंत घनश्याम महाराज यांनी उपोषण सुरू केल्यानंतर तत्काळ मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे यांनी लेखी आश्वासन देऊन सुद्धा महंत महाराज यांनी सकाळी उपोषण सोडण्यास नकार दिला होता. यावेळी भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, विरोधी पक्ष नेते शेख कुर्बान, एपीआय दत्तात्रय निकम यांनी महाराजांना उपोषण मागे घेण्यास विनंती केली परंतु महंत घनश्याम महाराज यांनी नकार दिला.
महंतांचा आदर मात्र खोट्या तक्रारी -हेमराज चौधरी
महंत घनश्याम महाराज यांचा आदर असून पराभवाचे शल्य बोचून खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे नगरसेवक हेमराज चौधरी म्हणाले. पालिकेत तीस वर्षाचा ज्यांना अनुभव आहे त्यांनी आरोप करणे दुःख वाटते, असे ते म्हणाले. जनतेने अमिता चौधरी यांना विजयी केले व महंत घनश्याम दासजी महाराज यांना नाकारल्याने पराभवाच्या शल्यातून माझ्यावर खोटे आरोप करून तक्रारी केल्या जात असल्याचे चौधरी यांनी पत्रकान्वये कळवले आहे.