महर्षी वाल्मिकी उद्यानातील पथदिवेच अंधारात

0

उपमहापौरांच्या प्रभागातील या उद्यानाकडे दुर्लक्ष; मुलांना अंधारात खेळण्याची वेळ

येरवडा : महापालिका उद्यान विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उपमहापौरांच्या प्रभागात उभारण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी उद्यानात चिमुकल्यांना चक्क अंधारात खेळण्याची वेळ येत असल्यामुळे पालिका अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला असून उद्यानाची दुरुस्ती लवकर न केल्यास राष्ट्रीय परिवर्तन संघटनेच्या वतीने पालिका उद्यान कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव डावरे यांनी दिला आहे.

नागपूर चाळ-शांतीनगर प्रभाग क्र. 2 येथील प्रतीकनगर-मोहनवाडी भागातील नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उद्यान उभारण्यात आले. या उद्यानात सकाळ-संध्याकाळ परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरीक, महिलांचा वावर अधिक असतो. पालिका व आमदार निधीतून उद्यानात खेळण्याच्या साहित्यासह व्यायामाचे साहित्य बसविण्यात आले आहे.

अंधार पडल्यावर या ठिकाणी मुलांना खेळणे अवघड होऊन बसते. मुलांना खेळण्यासाठी खेळणी आहे. त्या ठिकाणी पालिका विद्युत विभागाच्या वतीने बसविण्यात आलेले पथदिवे हे बंद असल्याने पालकांना मुले खेळतांना चक्क मोबाईलच्या टॉर्च लावून खेळविले जाते. मात्र अंधुक प्रकाशामुळे मुले खेळतांना अनेक वेळा पडून जखमी होतात. त्यामुळे अशा घडणार्‍या दुर्घटनांना जबाबदार कोण? असा सवाल डावरे यांनी केला.

आंदोलनाचा इशारा

विशेष म्हणजे 4 ते 5 वर्षांपूर्वी उद्यानात रखवालदारीचे काम करणार्‍या पालिकेच्या रखवालदाराच्याच मुलीचा विनयभंगाचा प्रकार घडला होता. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची वाट पालिका अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी पाहतात की काय?असा सवाल ही डावरे यांनी उपस्थित केला आहे. वारंवार पालिका उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार करून देखील अधिकार्‍यांनी नागरिकांच्या मुख्य समस्येकडे पाठ फिरवून तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे. उद्यानातील पथदिवे सुरू करण्याची मागणी डावरे यांनी केली असून अन्यथा संघटनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.