अनधिकृत होर्डिंग हटविण्याच्या निर्णयावर नवनीत कुमार ठाम
पुणे : होर्डिंगच्या परवान्यातून मिळणार्या महसुलापेक्षाही नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत बोर्डाने अनधिकृत होर्डिंग हटवावे, अशी ठाम भूमिका लष्कर बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल नवनीत कुमार यांनी घेतली. बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत कुमार यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकात ऑक्टोबरमध्ये होर्डिंगचा सांगाडा कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी लष्कर परिसरातील अधिकृत, अनधिकृत होर्डिंगची यादी सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार, बोर्ड प्रशासनाने केलेल्या पाहणीत तब्बल 54 ठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभे असल्याचे आढळून आले होते.
अनधिकृत होर्डिंगधारकांना पुन्हा नोटीस
हे होर्डिंग हटविण्यासाठी बोर्डाने संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र, या नोटिसांना बेकायदा होर्डिंगधारकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून अद्याप एकही होर्डिंग हटविण्यात आलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर बोर्डाने 30 नोव्हेंबर रोजी पुन्हा अनधिकृत होर्डिंगधारकांना नोटीसा बजावत कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर संबंधीत होर्डिंगधारकांनी डॅमेज चार्जेस भरून परवाने नूतनीकरणासाठी बोर्डाकडे अर्ज केला आहे. त्यावर बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. त्या वेळी मेजर जनरल कुमार यांनीही ठाम भूमिका घेतली.
स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय
दरम्यान, लष्कर परिसरातील खासगी जागेवरील सर्व अधिकृत होर्डिंगचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचा निर्णय पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने घेतला आहे. या कामासाठी स्वतंत्र संस्थेला नेमले जाणार असून त्या माध्यमातून महिनाभरात सर्व होर्डिंगची तपासणी केली जाणार आहे. लेखापरीक्षणाच्या अहवालात धोकादायक आढळणारे होर्डिंग तातडीने हटविण्यात येणार आहेत. त्यासाठीचा खर्च संबंधीत होर्डिंगधारकांकडून वसूल करण्याबाबत बोर्डाच्या आगामी सभेत निर्णय घेतला जाणार आहे.