न्हावी परीसरातील नेटवर्क सेवा ठप्प झाल्याने मोबाईल ग्राहकांचे हाल
फैजपूर- महसूल प्रशासनाची बिन शेतसार्याची थकीत रक्कम न भरल्याने तालुक्यातील न्हावी गावातील चार मोबाईल टॉवरला सील ठोकण्यात आल्याने नेटवर्कवर सेवेवर परीणाम झाल्याने ग्राहकांचे चांगलेच हाल होत आहे. थकबाकीअभावी व्होडाफोनसह एअरटेल, जीटीएल आणि रीलायन्स या मोबाईल कंपनीच्या टॉवरला सील ठोकण्यात आले आहे.
दिड लाखांच्या थकबाकीअभावी ठोकले सील
न्हावी गावात पाच मोबाईल टॉवर असून त्यापैकी केवळ एका मोबाईल टॉवरने बिनशेतसारा तसेच अनधिकृत दंडाच्या रकमेचा भरणा केला मात्र व्होडाफोनसह एअरटेल, जीटीएल आणि रीलायन्स मोबाईल कंपनीकडे प्रत्येकी 36 हजार 680 रुपयांची थकबाकी न भरल्याने महसूल प्रशासनाने चारही टॉवर सील केले. यापूर्वीच तलाठी राणे यांनी महसूल कर भरण्यासाठी नोटीस बजावल्या होत्या शिवाय गत आठवड्यात चारही मोबाईल कंपनी धारकांना तहसीलदार यावल यांच्या स्वाक्षरीचे नोटीस देऊन सात दिवसाची मुदत देण्यात आली होती.दिलेल्या मुदतीत महसूल न भरल्याने उपिवभागीय अधिकारी अजित थोरबोले यांच्या आदेशानुसार तहसीलदार कुंदन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर मंडाधिकारी जे.डी.बंगाळे, तलाठी लिना राणे, तलाठी एफ.एस.खान, तलाठी एम.पी.खुर्दा, तलाठी एस.टी.कोळी आदींनी चारही मोबाईल टॉवर सील केले.
बिनशेती प्लॉटची थकबाकी असणार्या मिळकतींवरही होणार कारवाई
फैजपूर परीसरातील फैजपूरसह पिंपरुड, न्हावी, मारुळ, विरोदा, आमोदा येथील बिनशेती प्लॉट धारकांकडे बिनशेतीसारा बाकी असून अशांनाही नोटीस बजावण्याचे कामकाज सुरू आहे. जे प्लॉट धारक बिनशेती सारा भरणार नाहीत त्यांच्यावर 25 टक्के अधिकचा दंड आकारणी करून याबाबत अथवा सदर मिळकती शासन जमा करण्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईची वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी घेत प्लॉट धारकांनी तातडीने बिनशेती सहारा भरावा, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.