जालना । परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना अप्पर पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयात महसूल संघटनांच्या व महाराष्ट्र राज्य महसूल राजपत्रीत अधिकारी संघटनेने लेखणी बंद आंदोलन केले आहे. या अचानक झालेल्या लेखणी बंदमुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यांच्या कामांचा खोळंबा झाला होता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद आणि अंबड येथे महसूल संघटना आणि राजपत्रीत अधिकारी संघटनेच्या वतीने लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर द्वारसभा घेवून निषेध नोंदवत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
अधिकारी, कर्मचारी, तलाठी संघटना सहभागी
परभणी दौर्यांवर खा. राहुल गांधी हे आले असता त्या दिवशी अप्पर पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी परभणीचे तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की केल्या प्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करत या घटनेचा निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे कामे दिवसभर खोळंबली होती. जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये झालेल्या लेखणी बंद आंदोलनात विभागीय अधिकारी केशव नेटके यांच्यासह दत्ता भारस्कर (तहसीलदार अंबड), संतोष बनकर (तहसीलदार स.सा), विनीन पाटिल (तहसीलदार जालना ), पाटील तहसीलदार (परतूर), डी.टी. सोनटक्के (तहसीलदार महसूल), संदिप ढाकणे (नायब तहसीलदार), खटावरकर (नायब तहसीलदार), व्इी. भालेराव, एस.एम. जोशी. रवि कांबळे, राजु निहाळ, एन.डी. घोरपडे, व्ही.डी म्हस्के, याहया पठाण, शरद नरवडे, प्रिती चौधरी, माधुरी मोरे, स्वाती राठोड, अनिता आंधळे, जे.बी. ठोसर, एस.पी. तांदळे यांच्यासह महाराष्ट्र राज्य महसूल राजपत्रीत अधिकारी, कर्मचारी, तलाठी संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.