शिरगाव : येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली मतदार यादी सदोष आहे. या यादीत मयत व स्थलांतरीत लोकांचीदेखील नावे समाविष्ट आहेत. त्यामुळे ही यादी दुरुस्त करून नवीन यादी जाहीर करावी, या मागणीसाठी शिरगाव येथील काही ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, सदोष यादी रद्द करून नवी यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन महसूल प्रशासनाने दिल्याने शिरगाववासीयांनी उपोषण मागे घेतले आहे, अशी माहिती योगेश गोपाळे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली.
मागणी बेदखल केल्याने उपोषण
नोव्हेंबर महिन्यात शिरगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीत अनेक चुका आहेत. अनेक मयत व स्थलांतरीत मतदारांची नावे यादीत आहेत. ही यादी दुरुस्त करून नवी यादी जाहीर करावी, अशी मागणी शिरगावच्या काही ग्रामस्थांनी केली होती. परंतु, महसूल प्रशासनाकडून या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. अनेक वेळा ग्रामस्थांनी ग्रामसेवक, तलाठी यांनादेखील याबाबत माहिती दिली होती. तरीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी शेवटी लाक्षणिक उपोषणाचा मार्ग निवडला होता.
तहसीलदारांना निवेदन
सदोष मतदार यादीसंदर्भात शिरगावच्या काही ग्रामस्थांनी मावळच्या तहसीलदारांना निवेदन देऊन यादी अद्ययावत करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांनी यादी दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. त्याचप्रमाणे, आक्षेप घेण्यात आलेल्या स्थलांतरीत मतदारांना त्यांच्या रहिवासाचा पुरावा सादर करण्याचेदेखील आदेश तहसीलदारांनी दिले होते. अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व्हे करण्यात येईल, मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात येतील, असे आश्वासन तहसीलदारांचे प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक व तलाठी यांनी उपोषणकर्त्या ग्रामस्थांना दिले. त्यामुळे शिरगाववासीयांनी आपले उपोषण मागे घेतले.
यांचा होता उपोषणात सहभाग
भागुजी गोपाळे, भानुदास गोपाळे, नवनाथ गोपाळे, डॉ. संतोष गोपाळे, गोरख गोपाळे, योगेश गोपाळे, गोरख गोपाळे, सतीश गोपाळे, रमेश गोपाळे आदी ग्रामस्थांनी उपोषणात सहभाग घेतला होता. अद्ययावत मतदार यादी तयार केली जाणार असल्याने उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.