महाआघाडीकडे नेता आणि नीतीही नाही – अमित शाह

0

पुणे : भाजप जिंकला तर घराणेशाही आणि जातीवाद गाडला जाईल, महाआघाडी निवडून आली तर पुन्हा घराणेशाही आणि जातीयवाद वाढेल, त्यांना नेता नाही आणि नीतीही नाही, अशी टीका अमित शाह यांनी केली. देशाला आज मजबूत सरकारची गरज आहे आणि मजबूत सरकार फक्त भाजपच देऊ शकतो, असा दावाही अमित शाह यांनी केला.

शक्ती केंद्र संमेलन आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज (शनिवार) पुणे दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाह बोलत होते.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा जिंकल्या पाहिजेत, आणि बारामतीची जागा जिंकल्याशिवाय ४५ जागा पूर्ण होणार नाहीत. मोदींच्या विजयाचा अश्वमेध कुणीही रोखू शकत नाही असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच घरावर भाजपचा झेंडा लावून कामाला लागा, आणि राज्यात लोकसभेच्या ४५ जागा निवडून आणा, असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजप कटिबद्ध आहे. मंदिर तेथेच होणार, याबाबत कुणीही शंका घेऊ नये, अयोध्येत राम मंदिर व्हावे कि नाही, हे अशोक चव्हाण आणि शरद पवार यांनी जाहीर करावे, असे आव्हानही अमित शाह यांनी दिले.