महाआघाडीत मनसेला स्थान नाहीच !

0

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी औरंगाबादहून एकाच विमानाने मुंबईला आले. या भेटीची सध्या राजकीय चर्चा सुरु आहे. राजकीय वर्तुळात मनसेला महाआघाडीत स्थान मिळणार अशी चर्चा सुरु होती मात्र राजकीय वर्तुळातील या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मनसेला महाआघाडीत स्थान नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंची शैली आणि त्यांच्या पक्षाच्या विचारधारेमुळे मनसेला महाआघाडीत घेता येणार नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.

महाआघाडीत मनसेला घेण्यासाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. पण, काँग्रेसने मनसेला विरोध केला. त्यामुळे राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता महाआघाडीत मनसेला स्थान नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील मनसे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तर, काँग्रेसचा राज ठाकरेंना मनसे विरोध असल्यानेच ही आघाडी फिस्कटल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. गुरुवारी चिकलठाणा विमानतळावरुन सायंकाळी 6 वाजता ते मुंबईकडे रवाना झाले. याच विमानातून पवारदेखील रवाना झाले. याची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. विमान प्रवासात या दोघांमध्ये काय गुप्तगू झाले, याचे अंदाज बाधण्यात येऊ लागले. तर, अनेकांनी सुतावरुन स्वर्गही गाठण्यास सुरूवात केली होती. पण, आता मलिक यांच्या स्पष्टीकरणानंतर या सर्व चर्चा केवळ हवेतील बुडबड्याप्रमाणे ठरल्या आहे.