नंदुरबार। नंदुरबार शहरात रविवारी होणार्या महाआरोग्य शिबिराची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू आहे. या शिबिरात राज्यभरातील तीन हजारांवर तज्ज्ञ डॉक्टर तब्बल दीड लाख रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील मोदी मैदानावर भव्य मंडप उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्याबरोबरच या दिवशी रुग्णांना उन्हाचा कमीत कमी त्रास व्हावा म्हणून अत्याधुनिक अशा फॉगिंग सिस्टिमचा वापर केला जाणार आहे. रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी जळगाव येथील प्रसिध्द जैन इरिगेशन कंपनी यांच्यामार्फत फॉगिंग सिस्टिम देण्यात आली आहे.
जैन इरिगेशन कंपनीतर्फे कार्यान्वयन
जिल्ह्यातील रुग्णांना एकाच ठिकाणी तपासणी होवून औषधोपचाराच्या सुविधा मिळाव्यात म्हणून मोदी मैदानावर भव्य असा शामियाना उभारण्यात येत आहे. या शामियान्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो बाहेरील तापमानापेक्षा किमान 13 अंश सेल्सिअस कमी असणार आहे. त्यामुळे रुग्णांना वैशाखातील उन्हापासून दिलासा मिळणार आहे. महाआरोग्य शिबिरात येणार्या रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी जळगाव येथील प्रसिध्द जैन इरिगेशन कंपनी यांच्यामार्फत फॉगिंग सिस्टिम कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जैन एरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बर्हाटे यांनी सांगितले आहे. वातावरणातील आर्द्रता नियंत्रित करुन तापमानामुळे रुग्णांना दिलासा देणारी ही यंत्रणा आहे.
फॉगिंग सिस्टिम प्रथमच शिबिरात
फॉगिंग सिस्टिम प्रथमच नंदुरबारमध्ये अशा महाआरोग्य शिबिरात बसविल्यामुळे येणार्या रुग्णांची चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सिस्टिममुळे दैनंदिन तापमानापेक्षा किमान 13 अंश सेल्सिअस तापमान कमी होऊन महाआरोग्य शिबिरामध्ये आल्हाददायी व प्रसन्न वातावरणाच्या निर्मितीसाठी मोठी मदतच होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी जैन एरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी.एम.बर्हाटे स्वत: तर त्यांचे सहकारी विखार खान व त्यांचे पथक या ठिकाणी हजर राहून युध्दपातळीवर काम पूर्ण करीत आहेत. त्यांना रुग्णमित्र रामेश्वर नाईक, मंत्री महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव सहकार्य करीत आहेत.
तीन दिवस चालणार शिबिर
उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिकनंतर आता सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात रविवारपासून तीन दिवस महाआरोग्य शिबिराचे आयोजन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नियोजनाखाली सुरू आहे. या शिबिराचा अधिकाधिक रुग्णांना लाभ व्हावा म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांनाही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे या महाआरोग्य शिबिरासाठी किमान दीड लाख रुग्णांवर औषधोपचार व आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.