महाआरोग्य शिबिरासाठी दुर्गम भागात होतेय सर्व्हेक्षण

0

नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या डोंगररांगामध्ये सध्या महाआरोग्याचा जागर सुरू आहे. गावागावात आरोग्य यंत्रणेचे दूत पोहोचत असून रुग्णांचा शोध घेत आहेत. ज्या रुग्णांना संदर्भीय उपचाराची गरज आहे त्यांना महाआरोग्य शिबिरात दाखल करण्याचे नियोजन सुरू आहे. या महाआरोग्य शिबिराच्या तयारीचा जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आढावा घेत यंत्रणेला विविध सूचना केल्या. महाआरोग्य शिबिराचा निरोप पोहचत असून ग्रामस्थ आरोग्य तपासणीसाठी बाहेर पडत आहेत. यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. या महाआरोग्य शिबिरात एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून कामाला लागावे अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

महाआरोग्य शिबिराच्या पूर्व तयारीचा आढावा
नंदुरबार शहरातील मोदी मैदानावरील नियोजित महाआरोग्य शिबिराच्या पूर्व तयारीचा आढावा डॉ. कलशेट्टी यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रामेश्वर नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.सी. मंगळे, पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश गिरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये आदी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.महाजन यांच्या पुढाकारामुळे नंदुरबार जिल्ह्यात चौथे महाआरोग्य शिबिर संपन्न होत आहे. हे शिबिर सी. बी. पेट्रोल पंपाशेजारी मोदी मैदानावर 30 एप्रिल ते 2 मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात राज्यभरातून आलेले 2 हजार तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करतील. जिल्हाभरातून कमाल दोन लाख रुग्ण या शिबिरात येतील, तर त्यातील 20 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातील असा अंदाज आहे.

आदिवासी बांधवाकडून चांगला प्रतिसाद
महाआरोग्य शिबिरासाठी गेल्या 16 एप्रिल 2017 पासून नंदुरबार जिल्ह्यात गावनिहाय रुग्णांचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. जवळच्या आरोग्य केंद्र अथवा सरकारी रुग्णालयात रुग्णांची प्राथमिक तपासणी करुन त्यांनी कुठल्या तज्ञ डॉक्टरांना दाखवावे अथवा त्यावर कोणती शस्त्रक्रिया करावी लागेल याचे नियोजन या सर्वेक्षणात केले जात असून आदिवासी बांधवाकडून या सर्वेक्षणासही मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे. रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, एएनएम आदींचे सहकार्य लाभत आहे. आदिवासी भागातील रुग्णांना शिबिराच्यास्थळी आणण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर होणार आहे.