नंदुरबार । प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने जिल्ह्यात 30 एप्रिल, 2017 रोजी सी.बी. पेट्रोलपंप जवळील मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञ डॉक्टरामार्फत गरजू व गरीब रुग्णांवर मोफत उपचार होणार आहे. यासाठी रविवार 16 एप्रिल, 2017 पासून गांव पातळीवर सर्व्हेक्षणाचे काम सुरु करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे दिले.
शिबिर नियोजनासाठी बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात महाआरोग्य शिबिराच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.सी. मंगळे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक रघुनाथ भोये, कार्यकारी अभियंता जलसंपदा डी.डी. जोशी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) घनश्याम पाटील, नंदुरबार नगरपालिका मुख्याधिकारी गणेश गिरी, रामेश्वर नाईक, डॉ. कांतीलाल टाटीया, विजय कासार, राजेंद्र चौधरी, राजेंद्र शर्मा उपस्थित होते.
एकही रुग्ण वंचित राहू नये
जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी म्हणाले, या शिबिरात देशातील नामवंत डॉक्टर रुग्णांवर उपचार तसेच शस्त्रक्रीया करण्यासाठी उपलब्ध असतील. या संधीचा लाभ घेत जिल्ह्यातील गंभीर आजाराचा एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य अधिकार्यांनी घ्यावी. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, एएनएम आदींच्या सहकार्याने प्रत्येक घरापर्यंत शिबिराची माहिती पोहोचवावी. वैद्यकीय अधिकार्यांनी दुर्गम आणि आदिवासी भागात विशेष तपासणी शिबिराचे येत्या दोन दिवसात आयोजन करून गरजू रुग्णांना शिबिरासाठी पाठवावे, आदिवासी भागातील रुग्ण तपासणीसाठी, शिबिराच्या ठिकाणी आणण्यासाठी रुग्णवाहिकांचा उपयोग करण्यात यावा असेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले.
तयारीला आला वेग
आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी महाआरोग्य शिबिरासाठी गावामध्ये किती रुग्ण आहेत, रुग्णांसाठी किती औषधे लागतील, प्रत्येक आर.एस. मध्ये काय सुविधा आहे. यासाठी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे याची सर्व माहिती स्पष्ट करुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्यात. रामेश्वर नाईक यांनी शिबिराच्या आयोजनाची माहिती दिली. अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर आपला महत्वाचा वेळ शिबिरासाठी देण्यास तयार असून त्याचा लाभ जास्तीत जास्त गरजूंना मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.