नंदूरबार । येथील महाआरोग्य शिबीरात नोंदणी व तपासणी केलेल्या 370 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून येत्या 7 जून रोजी रुग्णांना विनामूल्य चष्मे दिले जाणार आहेत. या सर्व रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर फेरतपासणी करण्यात आली. या तपासणीत सर्वच्या सर्व रुग्णांवर करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांना औषधेही देण्यात आली. पद्मभूषण डॉ.तात्याराव लहाने हे स्वत: फेरतपासणीसाठी येथे आले होते.
750 रुग्णांवर तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया
पहिल्या टप्प्यात 370 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दुसर्या टप्प्यात सुमारे 1 हजार रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून 750 रुग्णांवर तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या 370 रुग्णांपैकी 49 रुग्णांची दृष्टी नाहीसी झाली होती या सर्व रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर दृष्टी प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वोत्कृष्ठ दर्जाचे साहित्य व रुग्णांची काळजी घेतली गेल्याने हे शक्य झाले आहे. महाआरोग्य शिबीरात तपासणी केलेल्या रुग्णांवरील लहान शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार असून हृदयविकार, न्यूरोसर्जरी व किडनी विकाराच्या शस्त्रक्रिया येत्या मंगळवारपासून धुळे येथील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालयाने धुळे येथील खाजगी रुग्णालयांशी या बाबतचा करार केला असून अशा प्रकारच्या सर्व शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रिया करण्यात येणार असलेल्या रुग्णांचे तालूकानिहाय नियोजन करण्यात आल्याचेही वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.गिरिष महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदिप जाधव यांनी कळविले आहे.