महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगारास अटक

0

पिंपरी-चिंचवड : हिंजवडी पोलिसांनी महाकाली टोळीतील एका सराईत गुन्हेगारास सोमवारी पाच पिस्टल व 15 जिवंत काडतुसासह अटक केली. सागर कुमार इंद्रा (वय 23 रा. थेरगाव) असे त्याचे नाव आहे. त्याला हिंजवडी येथील स्पाईन रोडवरून अटक केले आहे.

सव्वा सहा लाखांचा ऐवज जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जबरी चोरीचा तपास करत असताना पोलीस कर्मचारी विवेक गायकवाड यांना खब-याद्वारे खबर मिळाली की, सागर हा शस्त्रासह स्पाईन रोडवरील आशिर्वाद हॉटेल समोर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आज दुपारी चार वाजता सागरला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ताब्यातील मोटार (एमएच 04 ई.टी.1002) मधून त्याने चार पिस्टल व 13 काडतुसे विक्रीसाठी आणली होती. तसेच त्याच्या कंबरेला एक पिस्टल त्यात दोन जिवंत काडतुसे असे पाच गावठी पिस्टल व 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच त्याच्या ताब्यातील पोलो कार, असा एकूण 6 लाख 26 हजार 550 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

दरोडा, खून, चोरी, दहशतीचे गुन्हे
सागर याच्यावर फरासखाना, हिंजवडी, देहूरोड, चिंचवड, निगडी या पोलीस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच तो महाकाली टोळीचा सक्रीय सदस्य आहे. महाकाली टोळी ही निगडी, आकुर्डी, रावेत, देहूरोड या परिसरात दरोडा, खून चोरी, दहशत पसरविण्याचे काम करते. सागर हा याच टोळीचा सक्रीय सदस्य आहे. त्यामुळे पोलीसही खूप दिवसांपासून सागर याच्या मागावरच होते.

यांनी केली कारवाई
ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे गणेश धामणे, कर्मचारी विवेक गायकवाड, किरण लांडगे, आनंद खोमणे, संदीप होळकर, अशिष बेटके, अतिक शेख, ज्ञानेश्‍वर मुळे व आण्णा गायकवाड यांनी केली आहे.