महागडे पॉपकॉर्न विकत घेता मग मका का नाही?-गिरीश बापट

0

कोल्हापूर – विमानात अडीचशे रुपयांचे मक्याचे पॉपकॉर्न विकत घेता मग एक रुपये किलो रेशनवर मिळणारा मका का नको, असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून रेशनवर मिळणाऱ्या मक्यावरून मंत्री बापट यांना सध्या लक्ष्य केले जात आहे. रेशनवर देण्यात येणाऱ्या मक्याचे समर्थन करत मका जनावरांना घाला पण तो विकत घ्या, असे आवाहनही बापट यांनी केले.

केंद्र सरकारने रेशनवर मका बंधनकारक केला आहे. मात्र, महाराष्ट्रासाठी त्याऐवजी ज्वारी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रेशन व्यवस्थेत सुधारणा करून राज्यभरात बायोमेट्रिक प्रणाली लागू केली आहे. यामुळेच राज्यात सुमारे १२ लाख बोगस रेशनकार्ड मिळाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ही बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत.

पुरवठा विभागात आमूलाग्र बदल करून कार्यप्रणाली आधुनिक केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता रेशनिंग दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठीदेखील सरकार प्रयत्न करत आहे. रेशन दुकानातून धान्याबरोबरच आरे कंपनीची दूध उत्पादने, खते, बी-बियाणे, भाजीपाला, उज्ज्वला गॅसचे सिलिंडर या वस्तू विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही ते म्हणाले.

रेशनिंग प्रणालीमध्ये पूर्ण पारदर्शी व्यवहार ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धान्याच्या गोदामातून धान्य भरून गेलेला टेम्पो थेट रेशन दुकानामध्येच जाईल, याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली आहे. त्यासाठी राज्यामध्ये वर्षअखेरपर्यंत पुरवठा खात्याची सुमारे २६५ गोदामे पूर्ण होतील. शिवाय दुकानदारांना आता ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दुकानदारांच्या कमिशनमध्येदेखील वाढ करण्यात आल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.