महागड्या दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक

0

पनवेल : काही वर्षांपूर्वी वॉचमेनची नोकरी करणाऱ्या आरोपीने इतर ३ मित्रांच्या सहाय्यने गोदामातील ७ लाख रुपयांच्या महागड्या गाड्या चोरल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे. तालुका पोलिसांनी यातील चौघांना देखील अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

पनवेल तालुक्यातील डेरवली गावात गुरु गोविंद ओटो मोबाईल्स नावाचे गाड्यांचे गोदाम आहे. या गोदामातून मार्च महिन्यत७ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ४ महागड्या दुचाकी गाड्या चोरीला गेल्याची तक्रार हनुमंत रघुपती पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांचा तपास सुरु असतानाच दोन दिवसापूर्वी नेरे परिसरात चेन चोरल्या प्रकरणी पोलिसांनी अमर गणेश धुमाळ यास अटक केली होती. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चेनसह डेरवली येथील गोदामातून ३ मित्रांसह गाड्या मौजमजेसाठी चोरल्या असल्याची कबूली दिली आहे. वपोनी मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली आहे. काही वर्षापूर्वी या गुन्ह्यातील आरोपी देवेन्द्र संजय शेळके हा याच गोदामात वॉचमेनची नोकरी करत होता. त्यामुळे त्याला या गोदामाची सारी माहिती होती. त्याने नागेश सुधीर पाटील (वय २०, डेरवली), अमर अनंत पाटील (वय २०, डेरवली), अमर गणेश धुमाळ (वय २०, डेरवली) यांच्या मदतीने मार्च महिन्यात गुरु गोविंद ओटो मोबाईल्स या गोदामातील वॉचमेन झोपला असताना मौजमजेसाठी गाड्या चोरल्या असल्याची कबूली दिली आहे. या गाड्यावर चुकीचे नंबरप्लेट लावून हे आरोपी परिसरात फिरत होते मात्र त्याचा संशय कुणालाही आला नाही. पोलिसांनी आरोपींकडून २ गाड्या हस्तगत केल्या असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एम.आव्हाड करत आहेत.