महागाईविरूध्द भुसावळात लोक संघर्ष मोर्चाचे आंदोलन

सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी : भुसावळ विभागातील आदिवासी बांधवांचा आंदोलनात सहभाग

भुसावळ : लोक संघर्ष मोर्चातर्फे येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रांत कार्यालयासमोर दगडांची चूल करीत त्यावर चहा करून वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभुमीवर सरकारचा निषेध केला. यावेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला. यावेळी शेतकरीविरोधी तीन काळ्या कायद्यांचा निषेधही करण्यात आला.

गॅस हंडीला हार : चुलीवर बनवला चहा
बुधवारी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत चौधरी, दीपक काठे आदींनी आंदोलन केले. दगडांची चुल करून त्याखाली काड्या लावत चहा तयार करण्यात आला. गॅस हंडीला हार घालण्यात आला. यावेळी सरकारच्या विरूध्द घोषणाबाजी करण्यात आली. काळे तीन कृषी कायदे त्वरीत रद्द करावे तसेच प्रत्येक पिकांवर एमएसपी देण्यासाठी कायदा केला गेला पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली. कोरोनामुळे निधन झालेल्या कुटुंबाला पाच लाख रुपये भरपाई मिळावी तसेच एका सदस्याला नोकरी द्यावी, महागाई कमी करावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.

यांची होती उपस्थिती
बुधवारी करण्यात अलेल्या आंदोलनास लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, चंद्रकांत चौधरी, सचिन धांडे, दीपक काठे यांच्यासह यावल, रावेर तालुक्यातील आदिवासी बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त प्रांत कार्यालयाच्या परीसरात लावण्यात आला होता.