मुक्ताईनगर । अच्छे दिनचे स्वप्न दाखवत जनतेचा सपशेल भ्रमनिरास मोदी सरकारने तीन वर्षात केल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात मंगळवारी शिवसेनेने प्रवर्तन चौकात निदर्शन आंदोलन करीत तालुकावासीयांचे लक्ष वेधले. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे लोटगाडीवर दुचाकी ठेवण्यात आली तर सिलिंडर भाववाढीच्या निषेधार्थ चुलीवर स्वयंपाक करून मोदी सरकारवर टिकेचा आसूड ओढण्यात आला. तहसीलदार प्रशासनाला महागाई कमी करण्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले.
महागाईचा भडका, नागरिक होरपळले
केंद्रात मोदी सरकार येऊन तीन वर्ष पूर्ण झाले मात्र जनतेला महागाई कमी करण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे या सरकारचे पितळ पांढरे पडले आहे. जनतेच्या डोक्यावरून त्यांनी महागाई कमी करण्यापेक्षा जास्तीचा बोझा ठेवल्याने सामान्य नागरिक होरपळले आहेत. अच्छे दिन च्या नावाखाली जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाल्याने सेनेच्या आंदोलनात गॅस सिलिंडर रिकामे बाजूला ठेवून चुलीवर स्वयंपाक करण्यात आला तर पेट्रोल भाववाढीच्या निषेधार्थ लोटगाडीवर दुचाकी ठेवण्यात आली. मोदी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. जीवनावश्यक वस्तू पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅससह सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात भाववाढ तातडीने कमी करण्यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनाने वेधले लक्ष
केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई आकाशाला भिडल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. याबाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दुपारी 12 वाजता प्रवर्तन चौकात शिवसेनेतर्फे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शन आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात यांची उपस्थिती
शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, शहरप्रमुख बाळा भालशंकर, पंचायत समिती सदस्या भारती भोई, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, सुनील पाटील, सचिन पाटील, अॅड.मनोहर खैरनार, पुरुषोत्तम खेवलकर, नितीन कांडेलकर, राजेंद्र तळेले, विठ्ठल तळेले, सतीश नागरे, पंकज पांडव, राजेंद्र हिवराळे, रामराव पाटील, शेषराव कांडेलकर, किशोर घाटे, चंद्रकांत बढे, अजाबराव पाटील, किशोर पाटील, नरेंद्र गावंडे,सूर्यकांत पाटील, सुभाष माळी, राजेंद्र बंगाळे,नवनीत पाटील,भागवत कोळी,चंद्रकांत सोनवणे,सोपान मोरघळे, नामदेव भील, उमेश राणे, पंकज राणे, नीलेश बोराखेडे, शोभा कोळी, बेबाबाई कोळी, इंदूबाई भोई, लिलाबाई भील, अमरादीप पाटील, शुभम तळेले, संतोष कोळी, प्रवीण चौधरी, भूषण पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक, युवसैनिक व महिला शिवसैनिक उपस्थित होते.