मोदी, फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी
मुंबई : वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन शनिवारी सत्ताधारी शिवसेनेनेच मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यावर येत आंदोलने केली. भाजप सरकारविरोधात आक्रमक होत शिवसेनेने ही निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अरविंद सावंत आदी सेनानेते सहभागी झाले होते. निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केलेच पाहिजे, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरेंनी केली. सरकारवर टीका करणारे फलक हातात घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी आंदोलनादरम्यान अनिल देसाई व अरविंद सावंत या नेत्यांसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सत्तेत राहून आंदोलन करणार्या शिवसेनेवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
घोषणांनी गाठले शेवटचे टोक
शिवसेनेने महागाईविरोधातील हे आंदोलन मुंबईतल्या वेगवेगळ्या 12 ठिकाणी केले. पेट्रोल दरवाढीचा भडका आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईचा रस्त्यावर उतरून निषेध केला. दुर्देवाने ही पाळी आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटले. या आंदोलनात घोषणा देताना शिवसेनेने अगदी शेवटचे टोक गाठल्याचे दिसून आले. मोदी, फडणवीस यांच्याविरोधातील घोषणा देताना शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिकांनी कोणतेही तारतम्य बाळगले नाही. नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय, तसेच एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला, अशा घोषणा देण्यात आल्या. नही चाहिये अच्छे दिन; कोई लौटा दे मेरे बीते हुएँ दिन, नको तो गॅसचा नखरा, बाई आपला चुला बरा, बहुत हुई पेट्रोल-डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी मित्रपक्षावर रोष व्यक्त केला. सीएसटी परिसरात खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु असतान या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेने महागाईच्या राक्षसाची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली होती.
मुंबईत सर्वत्र आंदोलने
वांद्रे-कलानगर येथील म्हाडा कार्यालयाजवळ आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार तृप्ती सावंत, रमेश लटके, विभाग संघटक रजनी मेस्त्री, राजुल पटेल आणि सर्व नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारी तसेच शिवसैनिकांचा सहभाग होता. नॅशनल पार्क ते बोरिवली शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी आणि शिवसैनिकांसह जोगेश्वरी स्थानक पूर्व येथे महागाईविरोधात निदर्शने करण्यात आली. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला पूर्व नेहरूनगर येथील अभ्युदय बँकेजवळ आंदोलन करण्यात आले. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर श्रेयस सिग्नलपासून पुढे घाटकोपर पश्चिम येथे मोर्चा काढण्यात आला होता. कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली (पूर्व) ते सरोवर हॉटेल, कांदिवली (पश्चिम) असा मोर्चा काढण्यात आला होता. तर आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दादर रेल्वे स्थानकासमोर सुविधा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. दत्ता दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिरोमणी चौक, एलबीएस मार्ग ते कमल हॉटेलसमोर, भांडुप (पश्चिम) या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. तसेच चेंबूर नाका, करी रोड, लोअर परेल रेल्वे स्थानक आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
हे खाल्ल्या ताटात घाण करणारे!
जे मोदीजींच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींच्या विरोधी घोषणा देतात. खाल्ल्या ताटात घाण करणारे यांनाच म्हणतात, ज्या माणसाच्या जिवंतपणी मृत्यूच्या घोषणा दिल्या जातात तो दीर्घायुषी होतो असे म्हणतात. पण नवरात्रीत शिमगा करणार्यांना आईभवानी विवेकबुद्धी दे!
– आशीष शेलार, भाजप आमदार