महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर

0

ठाणे : वाढत्या महागाईवरून शिवसेना मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरली असून सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेने धडक मोर्चा काढला. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत चक्क चुलीवर भाकरी भाजण्यात आल्या. ’मोदींनी जनतेला ठेवलंय गॅसवर’ असे लिहिलेले सिलिंडरच्या आकाराचे पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

घरगुती गॅस महाग झाल्याने कशाप्रकारे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहेत हे दाखवण्यासाठी डोक्यावर लाकडाच्या मोळ्या घेतलेल्या महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. ’सामान्य माणूस झाला ’दीन’, कुठे गेले तुमचे अच्छे दिन’, अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी केली.