महागाई वाढत असतांना गरिबांनी काय खावे? प्रियंका गांधी

0

नवी दिल्ली: देशात महागाई वाढत असताना कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्वीटरद्वारे मोदी सरकारवर निशाना साधला आहे. देशात डाळ, भाज्या, तेल, पिठाचे दर वाढत असतांना गरीब जनतेने काय खावे?असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच भाजप सरकारने लोकांचा खिसा कापून त्यांच्या पोटावर पाय दिला असल्याची टीका त्यांनी केली. अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजीपाला आणि खाण्याच्या पदार्थांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. भाज्या, तेल, डाळ आणि पीठचे दरही वाढले असून गरिबांनी काय खावं?, असा सवाल करतानाच मंदीमुळे लोकांच्या हातातील रोजगार गेला आहे. त्यांना कामही मिळेनासं झालं आहे, असं प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनीही आकडेवारीच्या आधारे सरकारला धारेवर धरले आहे. अपूर्ण मॅनेजमेंटचं एक सर्कल पूर्ण झालं आहे. मोदी सरकार जुलै २०१४मध्ये सत्तेत आलं तेव्हा महागाई दर ७.३९ टक्के होता. डिसेंबर २०१९मध्ये हा दर ७.३५ टक्के इतका झाला आहे, अशी खोचक टीका चिदंबरम यांनी केली आहे. खाण्याच्या पदार्थांचे भाव १४.१२ टक्क्याने वाढले आहेत. भाजीपाल्याचे दर ६० टक्क्याहून अधिक झाले आहेत. कांदा १०० रुपये किलो विकला जात आहे. याच अच्छे दिनचं भाजपने जनतेला आश्ववासन दिलं होतं, अशी टीकाही त्यांनी केलीय.