महागाई विरोधात राष्ट्रवादीचे तिरडी आंदोलन

0

मुंबई । महागाईच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने गॅस दर वाढीच्या विरोधात आज सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाहेर जोरदार तिरडी आंदोलन केले. महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कहा है अच्छे दिन, असा सवाल करत नारे बाजी केली. या आंदोलनामध्ये चित्रा वाघ आणि कार्यकर्ता यांनी रस्त्यावरच काही काळ ठिय्या मांडल्याने स्थानकाबाहेर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ धरपकड करत कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आणि कोंडी सोडविली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलनाचा इशारा
केंद्र सरकारने नुकतीच केलेली गॅस दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून देखील यावेळी करण्यात आली. या सरकारच्या काळात जगणे कठीण झाले असून आता त्यात गॅस दरवाढीची भर पडली आहे. भाजप सरकारच्या या महागाईच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र भर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे. सत्तेत आल्यापासून भाजपने जनतेच्या हिताच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतलेले नाहीत. केवळ उद्योगपतींच्या बाजूने निर्णय घेतले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. ही दरवाढ म्हणजे जाहिरातीवर खर्च करण्यासाठी सामान्यांकडून केलेली वसूली आहे, अशा शब्दांत त्यांनी दरवाढीच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. रोज रोज किमती बढाये, बोलो अच्छे दिन किसके आए? हर हर जुमला, घर घर जुमला…..अशा घोषणा देत चित्रा वाघ आणि महिला कार्यकर्त्यानी दरवाढी आणि महागाई विरोधात आपला संताप व्यक्त केला.