जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांचा आरोप
माझ्याकडेही सीडी अन् पेन ड्राइव्ह
जळगाव: भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी बांधकाम व्यावसायिक श्रीकांत खटोड यांच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्थांच्या जमिनी लाटल्याचा खळबळजनक आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान महाजन यांच्या गैरव्यवहारासंदर्भातील सीडी आणि पेन ड्राइव्ह माझ्याकडेही असुन त्या योग्यवेळी उघड करणार असल्याचे ललवाणी यांनी सांगितले. भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्याविरोधात पत्रकार परिषदांचा सपाटा सुरू आहे. जमिनी लाटल्याच्या विषयावरून महाजनांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहे. आज जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनीही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर तोफ डागली.
ललवाणी यांनी सांगितले की, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी ताब्यात घेण्यासाठी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्यावर नगरपालिकेत 10 लाखाच्या पाइपाच्या अपहाराचा खोटा गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयाने सांगितले की, यात मुख्याधिकार्यांचे नाव नसल्याने आम्हाला जामीन मिळाला. पीआय शेख यांनी आम्हाला अनेकवेळा धमक्या दिल्या. बिबेवाडी पोलीस ठाण्याला माझ्याविरूध्द गुन्हा दाखल केला. संस्था त्यांच्या ताब्यात द्या असे पोलीस अधिकारी मला सांगत होते. महावीर जयंतीच्या दिवशी महिलेला आत टाकण्याचे पाप केले. पिंटू चिप्पडवर अतिक्रमणाचा गुन्हा दाखल केला. राजू पाटील यांच्यावरही खोटा गुन्हा दाखल करून जेरीस आणले. धारीवाल आमच्या संस्थेचे सचिव आहेत. त्यांच्यावर खटोड आणि महाजन यांनी दम दिला असे आरोप त्यांनी केले आहे.