नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांची महाजानादेश यात्रा निघाली होती. या यात्रेचा आज नाशिकमध्ये समारोप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वीची ही सभा असल्याने मोदींकडून मोठ्या घोषणेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुपारी १.१५ सभेला सुरुवात होणार आहे. दुपारी 12.30 वाजता ओझर विमानतळावर मोदींचे आगमन होणार आहे. त्यांतर ते तपोवन नाशिककडे रवाना होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2014 मध्ये ज्या ठिकाणी सभा झाली त्याच ठिकाणी म्हणजे तपोवनातील साधूग्रामच्या जागेवर आजची सभा होणार आहे. नाशिकच्या तपोवन परिसरातील 20 एकर जागेवर ही सभा होणार असून, या सभेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पावसाचे सावट असल्याने 20 वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले आहेत. भव्य व्यसापीठासह दोन लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था आणि साधारण 30 स्क्रीन लावण्यात आले आहेत.