महाडमधील रासायनिक कारखान्यात स्फोट

0

दोन कामगार जखमी, कारखान्याचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

महाड । महाड औद्योगिक परिसरातील प्रदीप शेट्टे प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कारखान्यात गुरूवारी सकाळी रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार जखमी झाले आहेत. यामध्ये कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. या कारखान्यातील यंत्रसामग्री जीर्ण अवस्थेत असून दोन वर्षांपूर्वीदेखील असाच स्फोट होऊन एक कामगार दगावला होता. महाड औद्योगिक वसाहतीमधील सी फेजमधील प्रदीप शेट्टे प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कारखान्यात सकाळी सव्वा अकरा वाजता प्रोडक्शन विभागात रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. कंपनीच्या छतावरील सर्व पत्रे उडून गेले. कांही तुकडे समोरील रस्त्यावर पडले मात्र यादरम्यान वाहतूक तुरळक असल्याने कोणाला इजा झाली नाही. यावेळी प्लांटमध्ये जवळपास आठ कामगार काम करत होते. मात्र गोपीनाथ पांढरे व विकी चौधरी हे दोन कामगार जखमी झाले आहेत. त्यांना एमएमएच्या हॉस्पिटलमध्ये तत्काळ उपचार करण्यास दाखल करण्यात आले आहे.

अधिकार्‍यांचे दुर्लक्षामुळे अपघाताचे प्रमाण वाढले
आजही कंपनीच्या परिसरात अवास्तव पडलेले ड्रम, अस्वच्छता, तशीच अवस्था कायम आहे. संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांचे आरोग्य आणि जीवन धोक्यात आले आहे. कामगार आणि कंपनी सुरक्षा अधिकारी दुर्लक्ष करत असल्यानेच अशा कंपन्या अपघात होऊनदेखील बिनदिक्कत सुरूच राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कामगार सुरक्षा, कंपनी परिसराचे नियम धाब्यावर
या घटनेची खबर मिळताच महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ हजर झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरु आहे. प्रदीप शेट्टे प्रा. लि. या कारखान्यात 2014 मध्ये अशाच प्रकारे भीषण स्फोट झाला होता. यावेळीदेखील एक कामगार जागीच ठार झाला होता. सदर कंपनी प्रत्यक्षदर्शी अत्यंत भंगार अवस्थेत आहे. पूर्वीचा प्लांट प्रदीप शेट्टे या नावाने सुरू करण्यात आला. जुनीच यंत्रे आणि यंत्रणा तशीच कार्यान्वित करून हा प्लांट सुरू होता. यामध्ये अपघात झाल्यानंतर कारखाना बंद होईल किंवा सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, कामगार सुरक्षा आणि कंपनी परिसराचे नियम धाब्यावर बसवून हा कारखाना पुन्हा तशाच पद्धतीने सुरू करण्यात आला होता.