महाड । मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने ओखी चक्रीवादळामुळे रायगडसह कोकणला अतिवृष्टी व सावधानतेचा इशारा दिल्याने महाडमध्ये शुकशुकाट होता. याचा परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवरही झाला. महाडमध्ये पावसामुळे भाताच्या उडव्या भिजल्या असून, कडधान्य शेती धोक्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याने पालकांची नेहमीची वर्दळ, स्कूल बस यांची वाहतूक ठप्प होती. शाळांचा परिसर शांत दिसत होता. एरव्ही गजबजलेले रस्ते मोकळे होते. तर महाडच्या बाजारपेठेतही शुकशुकाट होता. ग्रामीण भागातून शहरात येणारी वर्दळ थांबलेली होती. सरकारी कार्यालयातील कामकाजही नागरिकांमुळे थंडावले होते.
कडधान्य पीक अडचणीत
अनेकांनी आज प्रवासाचे बेत रद्द केल्याने मुंबई-गोवा महामार्गावरही फारशी वाहतूक नव्हती. ओखी चक्रीवादळामुळे महाड तालुक्यात भात मळणीसाठी रचलेल्या भाताच्या उडव्या भिजल्या. त्यामुळे भाताचे नुकसान झाले आहे. तालुक्यात मूग, मटकी, पावटा, वाल अशी कडधान्ये पीक अडचणीत आले आहे. पावसामुळे रचलेल्या उडवीतील भात भिजलेले आहे. आजच्या सारखा पाऊस पुन्हा झाल्यास लावलेले कडधान्यही कुजून जाईल. भात आणि कडधान्य अशा दोन्ही नुकसानीत शेतकरी सापडल्याची व्यथा शेतकरी महेंद्र कदम यांनी मांडली