रायपूर । भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शहा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चतुर बनिया असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस हा तत्वांवर चालणारा पक्ष नाही. फक्त स्वातंत्र्यप्राप्तीच्या विशिष्ट उद्देशासाठी काँग्रेसची स्थापना झाली होती. महात्मा गांधी चतुर व्यापारी होते. त्यांना काँग्रेसच्या अंधकारमय भविष्याची कल्पना होती. म्हणून त्यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता असे अमित शहा म्हणाले.
महात्मा गांधींना पक्षाचे भवितव्य माहिती होते
काँग्रेसपक्ष हा स्वातंत्र्य मिळवण्याचे केवळ एक साधन होते आणि महात्मा गांधी एक चलाख व्यापारी होते, असे विधान शहा यांनी केले. महात्मा गांधींना पक्षाचे भवितव्य माहिती होते. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्यानंतर लगेच काँग्रेस पक्ष विसर्जित करण्यास सांगितले होते. त्यावेळी त्यांनी तसे केले नाही. पण आता काही लोक ते काम पूर्णत्त्वास नेण्याचे काम करत आहेत, असा टोलाही त्यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला. छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते छत्तीसगडच्या तीन दिवसांच्या दौर्यावर आहेत.
माफी मागा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची विचारपद्धती अशी असेल तर भाजप देशाला कोणत्या दिशेने नेऊ पाहत आहे, याची कल्पना न केलेलीच बरी. महात्मा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या या विधानासाठी अमित शहा, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे.
रणदीप सुरजेवाला, काँग्रेसनेते
बदमाश गुंडांचे वक्तव्य
बदमाश आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने केले हे वक्तव्य आहे. याचा मा तीव्र शब्दात निषेध करतो. स्वतःच्या अवगुणाप्रमाणेच ते सर्वांकडे पहात असतात.
कुमार सप्तर्षी, अध्यक्ष, युक्रांद
देशात अस्तिवात असलेल्या 1650 पक्षांपैकी फक्त भाजप आणि दुसरे कम्युनिस्ट (मा) पक्ष यांच्यातच लोकशाही मुल्याची जपणूक केली जाते. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर राहुल गांधी हे पदभार घेतील. पण भाजपमध्ये पुढील अध्यक्ष कोण असेल, याचा कोणीच अंदाज लावू शकत नाही, असे शहा म्हणाले.