डॉ. बाबा आढाव : सत्यशोधक समाजाच्या १४४व्या वर्धापन दिनानिमित्त परिसंवाद
पुणे । लोक कष्ट करतात. पण स्वत:ला कष्टकरी मानत नाहीत. एकीकडे जाती अंताची प्रतिज्ञा केली जाते. तर दुसरीकडे जातीतील भांडणे वाढतच आहेत. बहुजन, दलित, स्त्रिया, कष्टकरी यांच्यावर होणारे अत्याचार वाढले आहेत. अशा परिस्थितीत महात्मा फुले यांचे विचार समाजात सुधारणा घडवू शकतात, असे मत ज्येष्ठ कामगार नेते आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले समता प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने सत्यशोधक समाजाच्या १४४व्या वर्धापन दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यामध्ये डॉ. आढाव बोलत होते. प्रा. डॉ. बेनझीर तांबोळी, प्रतिमा परदेशी आणि अॅड. शारदा वाडेकर आदी उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले, सत्यशोधक चळवळीचा विचार सर्वसमावेशक आहे. या चळवळीने सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. सत्यशोधक चळवळीचा विचार प्रत्यक्षात अंमलात आणण्याची गरज आहे.
इतर तलाकांचाही त्रास
डॉ. ताबोळी म्हणाल्या, तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला आहे. याविषयी सहा महिन्यांत कायदा करण्याबाबत संसदेला सांगितले आहे. तरीही मुस्लीम स्त्रियांवर केवळ तिहेरी तलाकमुळे अत्याचार होतो, असे नाही. इतर प्रकारे दिल्या जाणार्या तलाकचाही मुस्लीम स्त्रियांना त्रास होतो. त्या तलाकपद्धतीबाबत कोण बोलणार, त्यावर कोण आवाज उठविणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लढाई करून हाजी अली दर्गा येथे जाण्याचा अधिकार मुस्लीम महिलांनी मिळविला आहे. त्याप्रमाणे कब्रस्तान आणि मशिद येथे मुस्लीम महिलांना प्रवेश दिला पाहिजे. यासाठी सबळ लढाई उभारला पाहिजे, असे डॉ. तांबोळी यांनी सांगितले.
परदेशी म्हणाला, न्याय व्यवस्थेवर आजही जाती व्यवस्थेचा पगडा आहे. त्यामुळे न्याय व्यवस्थेची पुनर्रचना करण्याची गरज आहे. न्याय व्यवस्था अब्राम्हणी करणे आवश्यक आहे.