महात्मा फुले,सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांमध्ये मतभेद

0

कोअर कमिटीकडे काही गाळेधारकांनी केली नाराजी व्यक्त

जळगाव- मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना प्रशासनाच्या वतीने कलम 81 क ची नोटीस बजावण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात महात्मा फुले,सेंट्रल फुलेसह चार व्यापारी संकुलातील गाळेधारकांना पोस्टाद्वारे नोटीस बजावून 15 दिवसाचा अल्टीमेटम दिला.त्यामुळे भयभीत झालेल्या काही गाळेधारकांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर 42 गाळेधारकांनी मनपाकडे धनादेशाद्वारे भरणा केला.परंतु इतर गाळेधारकांना अंधारात ठेवल्याचा आरोप करत कोअर कमिटीकडे धाव घेवून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महात्मा फुले,सेंट्रल फुले व्यापारी संकुलातील गाळेधारकांमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे.
मनपा प्रशासनाने मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना कलम 81 क नुसार नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.तर आतापर्यंत महात्मा फुले,सेंट्रल फुले,जुने बीजेसह पाच व्यापारी संकुलातील गाळेधारकांना पोस्टाद्वारे नोटीस बजावली आहे.गाळेधारकांना नोटीस मिळाल्यानंतर गाळेधारकांच्या काही प्रतिनिधींनी पालकमंत्र्याची भेट घेवून भरणा करण्यासाठी सकारात्मकता दर्शविली.त्यानुसार जवळपास 42 गाळेधारकांनी आयुक्तांची भेट घेवून धनादेशाद्वारे भरणा केला आहे.

अंधारात ठेवल्याचा आरोप
महात्मा फुले,सेंट्रल फुले व्यापारी संकुलातील काही गाळेधारकांनी बुधवारी कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांची भेट घेतली. यावेळी तेजस देपूरा,संजीव पाटील,प्रदीप मंडोरा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, गाळेधारकांच्या काही प्रतिनिधींनी परस्पर निर्णय घेवून भरणा केला आहे.मात्र त्यांनी इतर गाळेधारकांना अंधारात ठेवल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर रमेश मताणी,बब्लू समदडीया,राजेश वरयाणी,बाबूशेठ कौराणी यांनी देखील डॉ.शांताराम सोनवणे यांची भेट घेवून चर्चा केली.

गाळेधारक धास्तावले
प्रशासनाने कलम 81 क ची नोटीस बजावून थकीत रक्कम भरण्यासाठी 15 दिवसाची मुदत दिली आहे. भरणा न केल्यास कारवाई करण्याची तंबी प्रशासनाने दिली आहे.त्यामुळे गाळेधारक चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान,दुपारी अनेक व्यापारी एकत्र आले होते.

आज बैठक
कोअर कमेटीचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली.यावेळी काही गाळेधारकांनी अडचणी सांगितल्या.तसेच प्रशासनाच्या भूमिकेविषयी चर्चा करण्यात आली. उद्या दि. 19 रोजी पुन्हा बैठक आयोजित केली आहे.