महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करा

0

रावेर। महात्मा फुले जनआरोग्य योजना वाढीव तरतुदीनुसार लागू करुन नविन आरोग्यपत्र मिळावे या मागणीसाठी रावेर तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा रावेर तालुका खान्देश माळी महासंघातर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याबाबत तहसिलदार रावेर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा ज्योतिबा फुले याच्या 125 व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त राज्य शासनाने नावात बदल करुन ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’असे नामकरण केले. राज्यातील ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लक्ष किवा त्यापेक्षा कमी आहे. अशा कुटूंबाचा या योजनेत समावेश होता.

योजनेतील तरतूदी याप्रमाणे
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत पात्र कुटूंबाला प्रतिवर्षे 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत व मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 2 लाख 50 हजार पर्यंत महाराष्ट्र शासन विमा हप्ता भरत असल्यामुळे निवडक आजारासांठी रुग्णाला मान्यताप्राप्त रुग्णालयात कोणतीही रक्कम द्यावी लागत नव्हती. नविन योजनेत विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून प्रतिवर्ष प्रतिकुटूंब दिड लाख रुपयांऐवजी आता दोन लाख रुपयांची मर्यादा वाढविण्यात आली आहे. मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठीची मर्यादा अडीच लाख रुपयावरुन आता तीन लाख रुपये करण्यात आली आहे. नव्या योजनेत स्वाईन फ्ल्यू, डेंग्युवरील उपचार खर्च तसेच सिकलेस, अ‍ॅनिमिया, लहान मुलांचे आजार, वार्धक्याचे आजार याचा समावेश करण्यात आला आहे.

योजना जुनीच फक्त नामकरण करण्याचा प्रयत्न
राज्य शासनाने 7 जून 2016 रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार महात्मा फुले याच्या पुण्यतिथीवर्षा निमित्त महात्मा फुले जन आरोग्य योजना असे नामकरण केले होते. 21 नोव्हेंबर 2016 पासून सुरु होणारी ही योजना मार्च 2017 मध्ये सुरु होईल किवा महात्मा ज्योतिबा फुले याच्या जन्मदिनी 11 एप्रिल 2017 रोजी ही योजना अंमलात येईल व नविन आरोग्यपत्र लाभार्थी कुटूंबाना वाटप होईल अशी अपेक्षा होती. परंतु तसे न होता जुनी योजना ही आहे त्या स्वरुपातच लागू आहे. फक्त योजनेचे नामकरण करण्याचा प्रयत्न केलेले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तरी राज्यातील हजारो गरजू रुग्णांच्या उपचारासाठी ’महात्मा फुले जनआरोग्य योजना’ वाढीव तरतुदीनुसार त्वरित लागू करावी. तसेच या योजनेचे नविन आरोग्यपत्र वाटप करावी. यासाठी आम्ही शासनाकडे वेळोवेळी मागणी केली. मात्र यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रावेर तालुका खान्देश माळी महासंघातर्फे बुधवार 28 जून रोजी सकाळी 11 वाजेपासून 1 दिवसीय धरणे आंंदोलन तहसिल कार्यालयासमोर करणार असल्याचा इशारा निवेदनात केला आहे. निवेदन देतांना महिला जिल्हाध्यक्षा शकुंतला महाजन, कांतीलाल महाजन, एल.डी. निकम, रामकृष्णा महाजन, तालुकाध्यक्ष मुरलीधर महाजन, गणेश फुलमाळी, प्रकाश महाजन, मनिष महाजन, योगेश महाजन, आकाश महाजन, ज्ञानेश्वर महाजन, कुमार नरवाडे, सिताराम महाजन, संतोष महाजन, एस.के. महाजन यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.